बावनकुळे तुला पक्षानं तिकीट दिलं नाही...मित्रा, कशाला बढाया मारतो!
Shiv Sena Minister Gulabrao patil slams BJP leader Chandrashekhar Bawankule

बावनकुळे तुला पक्षानं तिकीट दिलं नाही...मित्रा, कशाला बढाया मारतो!

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच जळगावात आले होते.

जळगाव : चंद्रशेखर बावनकुळे हा माझा चांगला मित्र आहे. मित्रा, तुला त्या भाजपने विधानसभेचे तिकीट दिले नाही, तरी तू बढाया मारतोस, तू पहिलं पक्षात तुझं दुकान पक्कं कर. मग माझ्यावर टीका कर, अशा शब्दांत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. (Shiv Sena Minister Gulabrao patil slams BJP leader Chandrashekhar Bawankule)

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच जळगावात आले होते. त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती. पत्रकारांनी याबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, बावनकुळे हा माझा चांगला मित्र आहे. परंतु त्यालाच भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. तरी हा त्याच पक्षाच्या बढाया मारत फिरत आहे.

मित्र म्हणून त्याला सांगणे आहे, अरे बाबा तुला पक्षाने तिकिट दिले नाही. नाथाभाऊंना तिकीट दिले नाही, त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. भाजपने ओबीसींना संपवण्याचे काम केले. त्याच पक्षाच्या तू बढाया मारत आहेस आणि माझ्यावर टीका करीत आहेस. पहिले पक्षात आपले दुकान पक्के कर मग माझ्यावर टीका कर, असा टोला पाटील यांनी लगावला. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षात कधीही अपमानजनक वागणूक देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस हे सुध्दा त्यांना नेतेच मानत होते. त्यांच्याच सल्ल्याने ते काम करीत होते. खडसे यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याची ताकद आमच्या कोणाच्यातच नव्हती, असे वक्तव्य बावनकुळे यांनी जळगाव दौऱ्यात केलं होतं. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॅारिअर उपक्रमासाठी चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात आले होते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही सर्व जण त्यांचे नेतृत्व मान्य करीत होतो. परंतु आपल्यावर अन्याय होत आहे, असे त्यांना का वाटले याची मला माहिती नाही. कुठे तरी विरोधी पक्षाने संभ्रम तयार केल्याने ते राष्ट्रवादीत गेले. पण आता खडसे यांची परिस्थिती काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करूनही त्यांना अद्याप मंत्रिपद दिले नाही. त्यांना प्रवेश केल्यावर ताबडतोब मंत्रिपद का दिले नाही. त्यांना आता का रखडवले जात आहे, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.

खडसेंचे भाजप वाढविण्यात मोठे योगदान असून  राज्याच्या विकासासही त्यांनी हातभार लावला आहे. पक्षात त्यांचा आदरच केला जात होता. देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्वांचेच ते नेते होते. त्यांच्यावर कुणी अन्याय करेल, एवढी हिंमत नव्हती. राष्ट्रवादीत जाण्याबाबत विरोधकांनी विरजण घालत दुधाचे दही केल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in