राहुल गांधींनी नकार दिल्याने शशी थरुर, मनीष तिवारी शर्यतीत - shashi tharoor and manish tiwari are race for leader of opposition | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राहुल गांधींनी नकार दिल्याने शशी थरुर, मनीष तिवारी शर्यतीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा बदलाचे वारे सुरू झाले आहे. परंतु, राहुल गांधींनी नकार दिल्याने इतर नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे जोरदार वारे सुरू झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LOP) अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. या पदासाठी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नकार दिल्याने शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मनीष तिवारी (Manish Tiwari) हे शर्यतीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी पदावरुन हटवले जाणार आहे. चौधरी यांना पदावरुन हटवावे यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पक्षाने आता एक व्यक्ती एक पद असा नियम अनुसरण्यास सुरवात केली आहे. चौधरी यांच्याकडे बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना एका पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधीररंजन हे पश्चिम बंगालमधील खासदार आहेत. तसेच ते बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षावर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली असल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागील वर्षी पत्र लिहिले होते. यानंतर पक्षात बदलाचे वारे सुरू झाले आहे. 

राहुल गांधींनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये शशी थरुर आणि मनीष तिवारी यांचा समावेश होता. हे दोघे आता शर्यतीत आहेत. याचबरोबर गौरव गोगोई, रवनीतसिंग बिट्टू आणि उत्तमकुमार रेड्डी यांच्याही नावाची चर्चा आहे.  येत्या 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नवीन पक्षनेत्याची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे...पहिला झटका अधीररंजना चौधरींना

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय समोर आणला आहे. पक्षातील नेतृत्वाची पोकळी दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यासह संघटनात्मक पातळीवर फेररचना करण्यात येणार आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख