काहीही बोलणाऱ्यांना अनावश्यक महत्व; कंगना प्रकरणी शरद पवारांनी सुनावले - sharad pawar said we are giving undue importance to those making such statements | Politics Marathi News - Sarkarnama

काहीही बोलणाऱ्यांना अनावश्यक महत्व; कंगना प्रकरणी शरद पवारांनी सुनावले

वृत्तसंस्था
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

पाली हिल्स परिसरातील अभिनेत्री कंगना राणावतचा बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली होती. यावर कंगनाने पुन्हा एकदा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगनाचे नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कालच कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली होती. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना आज सकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली होती. ती मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगनाचे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने तिला त्यांच्या वाहनात बसवले. तेथून तिला घेऊन तातडीने पथक बाहेर पडले. 

कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 

या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगनाचे नाव न घेता खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, काहीही विधाने करणाऱ्यांना आपण अनावश्यक महत्व देत आहोत. अशा प्रकारच्या विधानांचा जनतेवर कितपत परिणाम होतो हे आधी पाहायला हवे. माझ्या मते, लोक अशा विधानांकडे फारशा गांभीर्याने घेत नाहीत. 

राज्यातील पोलीस कशाप्रकारे काम करतात हे महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता वर्षानुवर्षे पाहत आली आहे. त्यांना पोलिसांची कार्यक्षमता माहिती आहे. त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर त्याला महत्व देऊ नये, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

पवार यांनी धमकीचे कॉल आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मला आलेल्या धमकीच्या कॉल्सचे तपशील मी तपास यंत्रणांना दिले आहेत. याआधीही मला असे कॉल आले होते. असे कॉल मी फार गंभीरपणे घेत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख