ब्रेकिंग : शरद पवार यांच्यावर तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू - sharad pawar operation is undergoing in breach candy hospital mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग : शरद पवार यांच्यावर तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पोटात दुखू लागल्याने त्यांना आजच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्या (ता.31) शस्त्रक्रिया केली जाणार होती मात्र, पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. पित्ताशयाच्या त्रासामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. आता शस्त्रक्रिया सुरू असून पवार यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, पवारसाहेबांची प्रकृती उत्तम आहे. घाबरण्यासारखं काही नाही. पिताशयाचा त्रास त्यांना होत होता. एक मोठा खडा आहे. तो टोचत असल्याने त्रास होत होता. मात्र, डॉक्टर लवकरच शस्त्रक्रिया करून तो काढतील. 

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे बुधवारी (ता.31)  त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, मंगळवारी (ता.30) सायंकाळी पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आधी दिली होती.

पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे सोमवारी (ता.29) रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता.31) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पोटात दुखत असल्यामुळे त्यांना आजच रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतरही त्यांना त्रास होऊ लागल्याने तातडीने त्यांच्यावर शस्त्रकिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पवार यांच्या प्रकृतीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याबद्दल पवार यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख