shamsunder agarwal levels allegation against parambir singh
shamsunder agarwal levels allegation against parambir singh

परमबीरसिंह यांना हाताशी धरुन महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा होता प्लॅन!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना हाताशी धरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्लॅन होता, असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Ex Mumbai CP Parambirsingh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या कटाचा परमबीरसिंह भाग होते, असा दावा यातील एका तक्रारदार  बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल (Shamsundar Agarawal) यांनी केला आहे. 

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परमबीरसिंह, उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यासह सुनील जैन आणि संजय पुनामिया या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अग्रवाल यांनी म्हटले आहे की, संजय पुनामिया हा परमबीरसिंह यांचा लायझनिंग एजंट होता. तो त्यांच्यासाठी पैसे वसुली करायचा. त्याने आमच्याकडून 2016 आणि 2021 मध्ये पैसे घेतले. त्याने अनेकदा परमबीरसिंह यांच्यासाठी खूप लोकांकडून पैसे गोळा केले. माझ्या काकांवर मोका लावण्याची धमकी त्याने दिली होती. संजय पुनामियाने आमच्याकडून एक मालमत्ता विकत घेतली. त्यानंतर पोलिसांनी आमच्या घरी छापा मारला आणि नंतर आम्हाला पैसे घेऊन सोडले. त्यानंतर पुन्हा तडजोड करुन आमच्याकडून मालमत्ता घेतली आणि काही रकमेचे धनादेशही सही करून घेतले. अकबर पठाण आणि संजय पुनामिया यांनी संगनमत करुन आम्हाला लुटले. 

महाविकास आघाडी सरकार कोण पाडणार याबाबत कल्पना नाही पण मला आणि साहेबांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, असे पुनामिया वारंवार म्हणायचा. मी केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये सीबीआय चौकशी सुरू होणार असल्याचे त्याने म्हटले होते. महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचा राजीनामा घेण्यासंदर्भात मला सांगितले आहे, असेही त्याने म्हटले होते. नंतर अनिल देशमुख यांना एप्रिलमध्ये राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्याने म्हटले खरे झाले आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील चार पाच मंत्र्यांच्या घरी सीबीआय जाणार, असेही त्याने म्हटले होते. यामुळे सरकार पडेल आणि नंतर केंद्रीय यंत्रणांच्या जोरावर काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा प्लॅन होता. 

पुनामिया हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असल्याचे मानले जाते. खंडणी प्रकरणातील तक्रारदार अग्रवाल आणि आरोपी पुनमिया हे दोघे भागीदार होते. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी यावर्षी मार्च महिन्यात एक बैठक झाली होती. सुमारे साडेतीन चाललेली ही बैठक अग्रवाल यांनी टेप केली होती. तीच आता या तक्रारीचा आधार आहे. 

पुनामियाच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. पेन ड्राईव्हमध्ये तीन आणि दोन तासांचे संभाषण सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने परमबीरसिंहांनाही अटक होऊ शकते. आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून बचाव करण्यात परमबीरसिंग यांना यश आले आहे. या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com