सरकारला तब्बल ९० टक्के सवलतीच्या दरात मिळतेय 'सिरम'कडून कोरोना लस - serum institute provides covid vaccine to government in 90 percent discount | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारला तब्बल ९० टक्के सवलतीच्या दरात मिळतेय 'सिरम'कडून कोरोना लस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी लशीचा तुटवडा जाणवत आहे.
 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी लशीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधी भारतीयांना लस आणि नंतर जगाला अशी भूमिका घेतली आहे. याचबरोबर सिरमकडून सरकारला ९० टक्के सवलतीच्या दरात लस दिली जात आहे. 

देशातील रुग्णसंख्या वाढत असताना लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात लशीच्या टंचाईमुळे अनेक जिल्ह्यांत लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, भारतात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे पुढील दोन महिने देशातील मागणी पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. देशातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये लशीची निर्यात सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. 

पूनावाला म्हणाले की, सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे. केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सवलतीच्या दरात लस देत आहोत. यामुळे आम्हाला फारसा नफा होत नाही. याचा परिणाम लशीचे उत्पादन वाढवण्यावर होत आहे. 

सिरमच्या उत्पादन प्रकल्पावर मोठा ताण आला आहे, असे सांगून अदर पूनावाला म्हणाले की, सिरमकडून दर महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोसचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत आम्ही केंद्र सरकारला 10 कोटी डोस दिले असून, 6 कोटी डोस निर्यात केले आहेत. देशातील प्रत्येकाला लस द्यायची झाल्यास तेवढे उत्पादन आता आम्ही सध्या घेऊ शकत नाही. सर्व जगाला लस हवी आहे. परंतु, आम्ही सध्या भारताच्या गरजेवर  लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयाला लस देणे आम्हाला सध्या तरी शक्य होत नाही. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख