नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोरोना लशीचे पाच लाख डोस दक्षिण आफ्रिकेने नाकारले होते. अखेर सिरमने दक्षिण आफ्रिकेला या डोसचे पूर्ण पैसे परत केले आहेत. आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या विषाणूवर ही लस परिणामकारक नसल्याने दक्षिण आफ्रिकेने ती नाकारली होती. याचबरोबर आधी पाठविण्यात आलेले दहा लाख डोस हे आफ्रिकेतील इतर देशांना देण्यात आले आहेत.
याविषयी बोलताना दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री झ्वेली खिझे म्हणाले की, सिरम इन्स्टिट्यूटने आम्हाला पाच लाख डोसचे पैसे परत केले आहेत. हे डोस आमच्यापर्यंत पोचले नव्हते. सिरमने पाठवलेले पैसे आमच्या बँक खात्यात आले आहेत. लस आणि पैशाचे कोणतेही नुकसान करता आम्ही यातून मार्ग काढला आहे.
आम्हाला आधी मिळालेले कोरोना लशीचे डोस वाया जातील, अशी चिंता व्यक्त होत होती. यातूनही आम्ही मार्ग काढून लस वाया घालवली नाही. सर्व लशींचा योग्य वापर झाला आहे. आम्हाला मिळालेल्या दहा काळ लशी आम्ही आफ्रिकेतील इतर देशांना विकल्या. यातून या लस वायाही गेली नाही आणि या देशांनाही लस मिळाली, असे आरोग्यमंत्री खिझे यांनी सांगितले.
आम्ही नाकारलेले कोरोना लशीचे पाच लाख डोस आफ्रिकेतील इतर देश वापरू शकतात. कारण त्या देशातील कोरोना विषाणूचे स्वरुप आमच्या देशातील विषाणूसारखे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लस प्रभावी ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार त्यांना ही लस वापरता येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सिरमला कायदेशीर नोटीस
सिरम ही जगातील सर्वांत मोठी लस निर्यातदार कंपनी आहे. अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लशीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लशीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लशीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने अॅस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
Edited by Sanjay Jadhav

