सिरमकडून थेट राज्यांना 400 रुपयांत तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत मिळणार कोरोना लस - serum announces rates of covid vaccines for states and private hospitals | Politics Marathi News - Sarkarnama

सिरमकडून थेट राज्यांना 400 रुपयांत तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत मिळणार कोरोना लस

वृत्तसंस्था
बुधवार, 21 एप्रिल 2021

लशीसाठी केंद्र सरकार विसंबून राहण्याची राज्यांना गरज नाही. राज्ये आणि खासगी रुग्णालये थेट लस खरेदी करु शकतात. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना खासगी कंपन्यांकडू थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्य सरकारांना ही लस 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत मिळणार आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, यापुढेही 150 रुपयांतच ही लस मिळणार आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले 50 टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.  

यासाठी सिरमने दरपत्रक जाहीर केले आहे. कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना 400 रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. पुढील 4 ते 5 महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला लस उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी अदर पूनावालांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांनी म्हटले होते की, आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ. 

केंद्र सरकारने पूनावालांची मागणी मान्य केली आहे. देशातील लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने सिरमला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1 हजार 500 कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज तत्वत: मंजुरी दिली. आता संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांकडे हा निधी पोचणार आहे. लवकरात लवकर हा निधी कंपन्यांना पोचेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख