चंद्रकांतदादा हे तर भाजपमध्ये नवीन..मी त्यांना सिरीयसली घेत नाही!

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात आज जोरदार जुंपली.
senior leader eknath khadse targets bjp state chief chandrakant patil
senior leader eknath khadse targets bjp state chief chandrakant patil

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या समाधानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी, असा टोमणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मारला. यावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुल्फी आणि चॉकलेटसाठीच चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले होते, असा टोला खडसेंनी लगावला आहे. 

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले होते की, खडसे यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता ठरला होता. मग तो दुपारी चारपर्यंत का लांबला? हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचे, हे ठरले नाही. तुमचे समाधान होईल? असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळेबळे नरिमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. 

तुमचे समाधान होईल यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होते आणि कॅडबरीनेही समाधान होते. त्यामुळे आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात, हे पाहावे लागेल. नाथाभाऊ यांच्याकडे आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत, असेही पाटील म्हणाले. 

याला आता खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, भाजपाने मला काहीही फुकट दिलेले नाही. मी माझे ४० वर्षांचे आयुष्य भाजपाला दिले आहे. मी जे काही मिळवलं ते मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांत पाटील यांचा भाजपशी संबंध तरी काय होता? ते विद्यार्थी परिषदेत होते. काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावे म्हणून ते भाजपमध्ये आले. त्यांना सगळं काही फुकट मिळालं. 

कोल्हापुरात आमदार आणि खासदार सोडाच साधा पंचायत समितीचा सदस्य तरी त्यांना निवडून आणता येईल का? ते भाजपमध्ये नवीन आहेत. त्यामुळे मी त्यांना सिरीयसली घेत नाही. विधानसभेत माझी बदनामी आणि छळवणूक झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. माझा गुन्हा काय, माझ्याविरोधात नेमके काय आहे, याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष करणे हा माझा स्थायी स्वभाव आहे. भाजपच्या सुरूवातीपासून मी काम केले. समोरासमोर लढलो पण पाठीत खंजीर कधी खुपसला नाही, असे खडसे म्हणाले.  

मी जयंतरावांशी पक्ष प्रवेशाबाबत बोललो त्यावेळी, ते म्हणाले की तुमच्या मागे ईडी (सक्त वसुली संचालनालय) लावतील. त्यावर मी म्हणाले होतो की, ते ईडी लावतील तर मी सीडी लावेल. तुम्हालाही माहिती हा काय प्रकार आहे. भाजपने मला अडगळीत टाकले होते. यापुढे संधीही मिळण्याची शक्यता नव्हती, असेही खडसेंनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com