बंटी पाटलांचा दे धक्का! एका दगाफटक्याच्या बदल्यात महाडिकांना 8 वेळा दाखवलं आस्मान

Satej Patil | Congress | Kolhapur : महाडिकांच्या वर्चस्वाला पुन्हा एकदा मोठा हादरा
Dhananjay Mahadik-Satej Patil
Dhananjay Mahadik-Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात आज काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे. (Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk)

जयश्री जाधव यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापुरच्या सर्व जनतेला दिले आहे. यात आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे या विजयासह सतेज पाटील यांनी देखील आपल्या एका वैयक्तिक दगाफटक्याचा पुन्हा एकदा बदला घेतला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सर्व सूत्र सतेज पाटील यांच्याकडे सोपविली होती. तर भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सूत्र दिले होते. त्यामुळे विळ्या-भोपळ्याचे वैर असलेले पाटील-महाडिक गट या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने आले होते.

Dhananjay Mahadik-Satej Patil
कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपला नाकारले

मात्र विजयश्री खेचून आणत सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महाडिक गटाला आस्मान दाखवलं. यापूर्वीही सतेज पाटील यांनी २०१४ मधील झालेल्या दगाफटक्याचा ७ वेळा बदला घेत महाडिक गटाला वर येवू दिलेले नाही.

काय घडलं होतं २०१४ साली?

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती असूनही राष्ट्रवादीचे तत्कालिन खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक निवडणुकीच्या केवळ १५ दिवस आधी भाजपमध्ये गेले, सतेज पाटील यांच्याविरोधात उभे राहिले आणि निवडून देखील आले. यामागे धनंजय महाडिक यांचेच ब्रेन असल्याचा आरोप काँग्रेस आणि सतेज पाटील यांच्या गटाने केला. त्यांच्या याच राजकारणामुळे आपला पराभव झाला असल्याचा आरोपही पाटील गटाने केला.

Dhananjay Mahadik-Satej Patil
फडणवीस, चंद्रकांतदादांसह ४० स्टार प्रचारक उतरुनही भाजपचा मोठा पराभव

याच दगाफटक्याच्या बदल्यात सतेज पाटील यांनी २०१६ साली विधानपरिषदेला महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील पाटील यांनी महाडिकांच्या ताराराणी आघाडीचा पराभव केला. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी उघडपणे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली आणि धनंजय महाडिक यांचा पराभव केला.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील अमल महाडिक यांचा पराभव केला. याशिवाय जिल्हात देखील ३ आमदार निवडून आणले. विधानसभेनंतर गोकूळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, पुन्हा एकदा विधानपरिषद आणि आता कोल्हापूर उत्तरच्या मैदानात पाटील यांनी महाडिक गटाला पाणी पाजले आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा कोल्हापूरच्या राजकारणावर प्रभाव, पकड कायम असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com