राजकारणातून संन्यास घेतलेल्या शशिकला वळल्या देवधर्माकडे! - sasikala natrajan offers special prayers at temple in rameswaram | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणातून संन्यास घेतलेल्या शशिकला वळल्या देवधर्माकडे!

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मार्च 2021

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे.  

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्यासाठी अण्णाद्रमुकने पुन्हा पायघड्या अंथरल्या असल्या तरी शशिकलांनी मात्र, याबद्दल मौन धारणे केले आहे. आता त्यांनी देवधर्माकडे मोर्चा वळवला असून, त्या विविध मंदिरांना भेटी देऊन पूजा करू लागल्या आहेत. शशिकलांनी सुरू केलेल्या विशेष पूजा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्या राज्यातील विविध मदिरांमध्ये पूजा करीत फिरत आहेत. त्यांनी आज रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात विशेष पूजा केली. याआधी त्यांनी तीन ठिकाणी धार्मिक पूजा केली होती. रामेश्वरम आणि रामनाथस्वामी मंदिरातील विशेष पूजेनंतर त्यांनी आणखी एका ठिकाणी पूजा केली. तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर शशिकलांनी सुरू केलेल्या विशेष पूजा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चाही होऊ लागली आहे. 

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकच्या बाजूने जनमत झुकले असून, शशिकलांचे भाचे अण्णाद्रमुकचे मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे. यावर शशिकलांना पक्षात परत आणणे हाच एकमेव पर्याय समोर उरला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये मतविभाजणी झाली होती. त्यावेळी अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती मात्र, द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या. 

शशिकलांच्या निवृत्तीनंतरही त्यांचे भाचे  व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे प्रमुख दिनकरन यांनी मागे न हटता निवडणूक लढवण्याची घोषणा केली. शशिकला आणि दिनकरन यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झाली होती. त्यावेळी दिनकरन यांनी स्व:तचा एएमएमके पक्ष स्थापन केला होता. त्यांनी जयललितांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ती जिंकून त्यांनी अण्णाद्रमुकला मोठा धक्का दिला होता. याचबरोबर मागील लोकसभा निवडणूकही त्यांच्या पक्षाने लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नव्हती मात्र, त्यांच्या पक्षाच्या मतांचा टक्का 8.46 टक्के होता. त्यांचे उमेदवार राज्यात तिसऱ्या स्थानी होते. त्यांनी प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाल्ली होती. 

दिनकरन यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीतही प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाणार आहे. त्यांच्यासोबत एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आल्याने त्यांना आणखी बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने हा धोका आधीच ओळखून दिनकरन यांना सोबत घ्यावे, यासाठी अण्णाद्रमुकवर दबाव आणला होता. परंतु, मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. आता शशिकला यांनी राजकीय निवृत्ती घेतली असली तरी आगामी काळात त्या भाच्याचा बाजूने पडद्यामागून सूत्रे हलवू शकतात, अशीही शक्यता आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख