रिक्षाचालकाचा झालो आमदार...

शिवसेनेत 17 वर्ष शहरसंघटक, उपजिल्हाप्रमुख पदासह विविध पद भूषवली. तीनवेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सदस्य, एमआयडीसी बोर्डाचा सदस्य आणि आता दहा वर्षापासून आमदार आहे. रोज मतदारसंघातील लोक आपल्या समस्या घेऊन येतात, त्या सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून राजकारणात आल्याचे चीज झाल्यासारखे वाटते.
रिक्षाचालकाचा झालो आमदार...

औरंगाबाद : नोकरी आणि रिक्षा चालवत आयुष्य जगत असतांना शहरातील दहशतीचे वातावरण, गुंडगिरी याचाही अनुभव आला. कधी गुंडप्रवृत्तीला रोखण्यासाठी तर कधी स्वरक्षणासाठी समवयस्क तरूणांबरोबर रस्त्यावर उतरलो आणि नकळत राजकारणात आलो. औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट आपल्या गतआयुष्याबद्दल पुढच्या वाटचालीबद्दल आणि सध्याच्या घडामोडीविषयी "सरकारनामा'शी मनमोकळेपणाने बोलत होते. सात रुपये रोजाने नोकरी, रिक्षा ड्रायव्हर ते आमदार असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. 

राजकारणात येईन असं कधी वाटलच नव्हतं, कारण घरची परिस्थीती बेताची, वडील एसटीमध्ये ड्रायव्हर आम्ही पाच भावंड आणि एक बहीण. त्यामुळे शिकता शिकता घरासाठी कमावण्याची वेळ आली. कॉस्मो फिल्म कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीला लागलो. सात रुपये रोज पगार मिळायचा, कंपनीत युनियन लागली, अध्यक्ष झालो. आता नोकरी जाणार हे वडिलांनी ओळखले आणि मला रिक्षा घेऊन दिली. 

या शहरातील परिस्थिती 80 -85 च्या सुमारास चांगली नव्हती, विशिष्ट धर्माची दहशत आणि गुंडगिरी याचा प्रत्यय रिक्षा चालवतांना येत असे. स्टॅंडवर रिक्षा लावण्यावरून वादविवाद, धमक्‍या हे प्रकारही वाट्याला आले. मनात प्रचंड चीड होती. पुढे येनकेन प्रकारे रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची वेळ आली, तो केलाही. 
पण तेव्हा राजकारणाचा गंध आणि आवडही नव्हती. आणीबाणीच्या काळात फक्त एकदाच "अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश' अशा घोषणा दिल्या तोच काय घोषणांशी संबंध. 

जातीय तणावातून शहरात एकदा दंगल झाली, शहरातील गुंडागिरीच्या विरोधात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, सिटीचौकात त्यावर दगडफेक झाली. मोर्चा आयोजनाच्या पत्रकात माझे नाव असल्याने पोलीस शोधत होते आम्ही लपत होतो. त्यानंतर जेव्हा केव्हा प्रसंग ओढावले तेव्हा मी आणि माझ्यासारखे असंख्य तरूण रस्त्यावर उतरू लागले. मुंबईत घोंगावत असलेले शिवसेना नावाचे वादळ एव्हाना शहरात आले होते. मधुकर सरपोतदार, साबीरभाई शेख या नेत्यांचे येणे-जाणे वाढले आणि शिवसेना मजबूत होऊ लागली. 

बाळासाहेबांची पहिली भेट आणि राजकारणाचा निर्णय 
शिवसेनेचा विस्तार होऊ लागला तसे संघटनेच्या कामानिमित्त मुंबईला जाणे-येणे वाढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड कुतुहल होते. अखेर बाळासाहेबांशी मातोश्रीवर पहिली भेट झाली. जणू माझा आणि त्यांचा रोजचा संबंध अशा आपुलकीने त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकत जवळ घेतले. तेव्हापासून ठरवले राजकारण करायचे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्राखालीच. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारणांचा त्यांनी दिलेला विचार यावरच आतापर्यंतची वाटचाल केली पुढेही करीन. 

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढवण्याची सगळी तयारी झाली होती. बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा शहरात आयोजित केली गेली आणि त्या सभेचे सुत्रसंचलन करण्याची संधी मिळाली. हर्सुल या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वार्डातून निवडणूक लढलो, पण दीडशे मतांनी पराभव झाला. तो पहिला आणि शेवटचा पराभव ठरला. 

शिवसेनेत 17 वर्ष शहरसंघटक, उपजिल्हाप्रमुख पदासह विविध पद भूषवली. तीनवेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सदस्य, एमआयडीसी बोर्डाचा सदस्य आणि आता दहा वर्षापासून आमदार आहे. रोज मतदारसंघातील लोक आपल्या समस्या घेऊन येतात, त्या सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून राजकारणात आल्याचे चीज झाल्यासारखे वाटते. बाळासाहेबांचे एक वाक्‍य आजही मला स्मरणात आहे. ते म्हणायचे, ""तुझ्याकडे पैसा किती आहे हे महत्वाचे नाही, तर तु माणस किती कमावलीस त्याला किंमत आहे. तुझ्या दारासमोर जेवढी जोड्यांची संख्या जास्त, तीच तुझी खरी संपती.'' त्यांचे हे शब्द आज माझ्या बाबतीत खरे ठरतायेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in