संभाजीराजे : चारही घरचा पाहुणा उपाशी!

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे (Sambhaji raje) यांची कोंडी
संभाजीराजे : चारही घरचा पाहुणा उपाशी!
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama

मी तुमचाच आहे, असे एका व्यक्तीला सांगणे किंवा एखाद्या पक्षाला सांगणे हे समजू शकतो. पण सर्व पक्षांना मी तुमचाच आहे, असे कसे पटेल? मी भाजपनियुक्त खासदार असलो तरी भाजपचा नाही. मी शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून गेलो तरी मी सेनेचा प्रचार करणार नाही. मी आणि माझी भूमिका ही स्वतंत्र राहील, असे गेले काही दिवस संभाजीराजे सांगत होतो. कोणताही पक्ष असे स्वातंत्र्य देत नाही. तुम्ही आमच्या मांडवाखाली आला म्हणजे तुम्ही आमचे झाला आहात, असा हा साधा नियम असतो. (Sambhaji raje news update)

भाजपनियुक्त खासदार झाल्यानंतर संभाजीराजे कधीच भाजपच्या व्यासपीठावर गेले नाहीत. त्या त्या पक्षाला त्यांच्याकडून ज्या अपेक्षा त्या पूर्ण झाल्या नाहीत. राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक पराभूत झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षाशी फारसा संबंध ठेवला नाही. काॅंग्रेसच्या नेत्यांना ते झुलवत राहिले. शिवसेनेने त्यांना अटींसह खासदारकी देणार असल्याचे सांगत जाहीरपणे फटकारले. त्यामुळे आता चारही घरचा पाहुणा उपाशी राहण्याची वेळ आली आहे. भाजपला त्यांचा आधीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे हा पक्षही राजेंना पाठिंबा देण्याची शक्यता कमीच दिसते आहे.

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

संभाजीराजे यांची राज्यसभेची उमेदवारी हा यांच्या समर्थकांनी भावनात्मक मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. मराठा कार्ड वापरले. छत्रपतींच्या घराण्याा उल्लेख करत त्या दृष्टीने दबाव आणण्याच्या खेळ्या केल्या. पण भाजपच्या अनुभवापासून हे पक्ष शिकलेले होते. राष्ट्रवादीने अलगदपणे संभाजीराजे यांची उमेदवारी या मुद्यातून आपले अंग काढून घेतले. काॅंग्रेसचे सतेज पाटील हे संभाजीराजे यांना भेटले. त्यांनी तर थेट काॅंग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. पण राजेंच्या मनात वेगळेच सुरू असल्याने त्यांनी या चारही पक्षांना त्या अर्थाने गृहित धरले. त्यांना वाटले आपल्या नावाचा दबदबा असल्याने शिवसेना सहजपणे आपल्याला पाठिंबा देईल. पण उद्धव ठाकरे हे देखील राजकारण कोळून पिलेले असल्याने त्यांनी सेनेत येणार असाल तरच राज्यसभेच्या उमेदवारीचा विचार करू असा निरोप धाडून आपला आक्रमकपणा कायम ठेवला.

Sambhajiraje Chhatrapati
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला पण असता. पण राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा करतानाच त्यांनी स्वराज या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली. तेथेच महाविकास आघाडीचे नेते नाराज झाले होते. म्हणजे भविष्यात आमच्या व्होटबॅंकेला तडा देणाऱ्या संघटनेची घोषणा करायची आणि आमच्याकडेच पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मागायची, असा राजेंचा डबल गेम महाविकास आघाडीच्या नेत्यांना रुचला नाही. राजेंची भविष्यातील स्वराज ही संघटना मराठा आणि छत्रपतींना मानणारा वर्ग यांच्यासाठीच असणार होती. त्याचा फटका अनुक्रम मराठा आणि शिवसेनेच्या व्होटबॅंकेला बसला असता. हा धोका वेळीच लक्षात आल्याने राजेंना असे स्वातंत्र्य देऊन उपयोगाचे नाही, हे ठाकरेंनी लक्षात ठेवले आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या हिताचा निर्णय घेत राज्यसभेपासून राजेंना दूर ठेवण्यात थेट भूमिका बजावली. भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना अशा चारही पक्षांशी आणि त्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध असले तरी राजे सध्या पदाविना उपाशी राहिले आहेत, हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in