प्रकाश शेंडगे म्हणतात, "संभाजीराजे, पोलिस भरतीला विरोध करू नका.." - Sambhaji Raje dont oppose police recruitment | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश शेंडगे म्हणतात, "संभाजीराजे, पोलिस भरतीला विरोध करू नका.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

संभाजीराजेंना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे, पोलिस भरतीवर आक्षेप घेऊ नये," असे मत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे. 

मुंबई : "महाविकास आघाडी सरकारनं पोलिस भरतीसाठी साडेबाराहजार जागा जाहीर केल्या आहेत. ही भरती यापूर्वी व्हायला हवी होती, पण झाली नाही. या पोलिस भरतीबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला आहे. संभाजीराजेंना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे, पोलिस भरतीवर आक्षेप घेऊ नये," असे मत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे. 

याबाबत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेंडगे म्हणतात की मराठा आरक्षणाची भूमिका आम्ही समजू शकतो. मराठा समाजावर अन्याय व्हायल नको. पोलिस भरतीसाठी रद्द झाली तर अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. संभाजी राजेंनी पोलिस भरतीला विरोध करू नये. पोलिस भरतीत मराठा आरक्षणाच्या 13 टक्के जागा राखून ठेवाव्यात अन्य 87 टक्के जागांवर भरती झाली पाहिजे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली असून समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी भूमिका मांडली आहे. या स्थगितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंचे मत आले नव्हते. त्यांनी ते आज सविस्तरपणे मांडले आहे. याबाबत ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे.

सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असाही इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये, अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे. समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, या बाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर नुकतेच मशाल आंदोलन करण्यात आले.  

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख