एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आठ दिवसात जमा होणार...    - Salary of ST employees will be collected in eight days | Politics Marathi News - Sarkarnama

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आठ दिवसात जमा होणार...   

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

अजित पवार यांनी तातडीने १५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. त्यातून कर्मचाऱ्याचे किमान एक महिन्याचे थकित वेतन महामंडळाला देणे शक्य होणार आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार असून, त्यापैकी एक महिन्याचे वेतन येत्या गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली.

अनिल परब म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मी महामंडळाची आर्थिक स्थिती विषद करताना पुढील सहा महिन्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व इतर अनुषंगिक खर्चासाठी सरकारने महामंडळाला आर्थिक मदत करावी, अशी विनंती केली होती. 

त्यानुसार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने १५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यातून कर्मचाऱ्याचे किमान एक महिन्याचे थकित वेतन महामंडळाला देणे शक्य होणार आहे. उर्वरित वेतनासंबंधी देखील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच ते वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार-भत्ते तसेच अन्य प्रलंबित मागण्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी तत्वतः मान्य केल्या आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परब यांची नुकतीच भेट घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील. तसेच, निधी उपलब्ध न झाल्यास प्रसंगी कर्जाची उभारणी करूनही कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आश्वासनही ऍड. परब यांनी यावेळी दिले होते. दरेकर यांनी यापूर्वीच या प्रश्नांबाबत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांचीही भेट घेतली होती. दोन महिने थकलेले वेतन कर्मचाऱ्यांना त्वरेने न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.  

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तसेच लॉकडाउनच्या काळातील 30 टक्के कर्मचाऱ्यांचे नाकारलेले पगार तातडीने द्यावेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणे लादलेली 20 दिवसांची सक्तीची रजा मागे घ्यावी. परिवहन मंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रतिदिवस 300 रुपये असा भत्ता आठवड्याच्या आत द्यावा, अशा मागण्या दरेकर यांनी परब यांच्याकडे केल्या. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची विमा रक्कम तातडीने द्यावी, असेही दरेकर यांनी सांगितले. 

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी दरेकर यांनी काही उपाय सुचवले होते. शालेय व अंगणवाडी पोषक आहार, रेशनचे धान्य आदी मालवाहतुकीची कंत्राटे खासगी वाहतुकदारांऐवजी एसटीला मिळावीत. सरकारने हा निर्णय घ्यावा यासाठी परिवहन मंत्र्यांनी प्रयत्न करावेत. संपूर्ण भारतात प्रवासी कर 6 टक्के आहे आणि महाराष्ट्रात तो साडेसतरा टक्के आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख