'झेड' सुरक्षा असलेल्यांवर हल्ले होत असतील तर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही!

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. आता शिरोमणी अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
sad leader harsimrat kaur badal slams punjab chief minister amarinder singh
sad leader harsimrat kaur badal slams punjab chief minister amarinder singh

चंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज जोरदार धुमश्‍चक्री उडाली. या वेळी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या मोटारीची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, यावरुन आक्रमक झालेल्या अकाली दलाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला 8 महानगरपालिका, 109 नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जलालाबादमध्ये निवडणुकीसाठी मंगळवारी अकाली दलाचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर दोन्ही गटांत जुंपली. 

या वेळी सुखबीरसिंग बादल यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला. यातून बादल बचावले  आहेत. या घटनेनंतर अकाली दल आक्रमक झाले आहे. अकाली दलाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल म्हणाल्या की, 'झेड' दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला होत असेल तर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गँगस्टर पंजाबमध्ये आता गुंडाराज चालवत आहेत. अशा प्रकारचे हल्ले होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. 

याबद्दल बोलताना अकाली दलाचे प्रवक्ते दलजितसिंग चीमा यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या पाठबळावर काँग्रेसच्या गुंडांनी बादल यांच्यावर हल्ला केला. बादल यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा द्यायला हवा. याचबरोबर या घटनेची चौकशी पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी. मुख्यंत्री अमरिंदरसिंग यांच्या काळात राज्यात लोकशाहीची हत्या सुरू आहे. 

या प्रकरणी सुखबीरसिंग बादल यांनी काँग्रेसचे आमदार रमिंदरसिंग अवला यांचे कुटुंबीय आणि पोलिसांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, नियोजनबद्धरीतीने अकाली दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. हिंसाचारात अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळी लागली आहे. हा गोळीबार आमदाराच्या मुलाने केला आहे. यादरम्यान पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com