रिहानाच्या विरोधात सचिन तेंडुलकर अन् गौतम गंभीर उतरले मैदानात! - sachin tendulkar and gautam gambhir replied to pop star rihanna | Politics Marathi News - Sarkarnama

रिहानाच्या विरोधात सचिन तेंडुलकर अन् गौतम गंभीर उतरले मैदानात!

वृत्तसंस्था
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कृषी कायद्यांवरुन सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिल्याने गदारोळ सुरू आहे. आता यात सचिन तेंडुलकरने उडी घेतली आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगप्रसिध्द पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. रिहानाच्या विरोधात अनेक सेलिब्रेटी आता मैदानात उतरू लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतनंतर आता सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर हे क्रीडापटू सरकारच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. 

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. आता हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  

याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकरने ट्विट केलं आहे. त्याने म्हटलं आहे की, भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होणार नाही. बाह्य शक्तींनी केवळ प्रेक्षक बनावे यातील भागीदार बनू नये. भारतीयांना भारत माहिती आहे आणि ते भारताबाबतचा निर्णय घेऊ शकतात. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात. 

भाजपचा खासदार असलेला गौतम गंभीरने म्हटले आहे की, बाह्य शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शतके त्यांनी आपल्यावर राज्य केले. परंतु, भारत या सगळ्यावर मात करीत आलेला आहे आणि पुढेही करीत राहील. तुम्ही अब्जावधीची संपत्ती वापरुन पाहा. हा नवीन भारत आहे. 

काय म्हटले आहे रिहानाने?
रिहाने ट्विटरवर एक बातमी शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर ''यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत'' कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 

कंगना राणावतचे प्रत्युत्तर
रिहानाच्या ट्विटनंतर कंगनानेही तिला ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणते, ''याविषयी कोणीच काही बोलणार नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहे. भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर चीन विभाजन झालेल्या भाग ताब्यात घेवून तिथे चायनीज कॉलनी उभारेल. तुमच्यासारखा आम्ही आमचा देश विकत नाही,'' असे कंगनाने म्हटले आहे. यावरच न थांबता कंगनाने एकामागोमाग एक ट्विटची मालिकाच सुरू केली आहे. रिहानावर अनेक वादग्रस्त आरोप तिने केले आहेत. खलिस्तानीशी संबंध असल्याचा आरोप करून त्यासोबत काही छायाचित्र टाकली आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख