सचिन पायलट यांना बालेकिल्ल्यातच मोठा झटका - sachin pilot suffers setback in city council elections in tonk rajasthan | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन पायलट यांना बालेकिल्ल्यातच मोठा झटका

वृत्तसंस्था
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठे यश मिळवले असताना सचिन पायलट यांना त्यांच्याच टोंक मतदारसंघातच मोठा झटका बसला आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. याचवेळी काँग्रेस नेते सचिन पायलट यांना त्यांच्या बालेकिल्ल्याच मोठा झटका बसला आहे. पायलट यांचा मतदारसंघ असलेल्या टोंकमधील नगरपालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून, काँग्रेस पिछाडीवर पडला आहे. 

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 90 नगरपालिकांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसने 48 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. भाजपने 37 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. याचवेळी दोन ठिकाणी काँग्रेसच्या पाठिंब्यावर इतरांना सत्ता मिळाली आहे. 

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काँग्रेसला यश मिळाले आहे. याचवेळी पायलट यांच्या टोंक विधानसभा मतदारसंघातील निवाई, देवली, उनियारा, टोडारायसिंह आणि मालपुरा या नगरपालिकांची निवडणूक झाली आहे. या पाचपैकी तीन नगरपालिकांत भाजपचा नगराध्यक्ष बनला आहे. याचवेळी काँग्रेसचा नगराध्यक्ष दोन ठिकाणी आला आहे. 

टोंक हा पायलट यांचा मतदारसंघ असल्याने येथील नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. टोडारायसिंह, निवाई आणि मालपुरा या नगरपालिकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. उनियारा आणि देवलीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपने येथे मारलेली मुसंडी आता काँग्रेससह पायलट यांची चिंता वाढवणारी ठरली आहे. 

टोंकमधील काँग्रेसच्या पराभवाचे कारण आमदार प्रशांत बैरवा हे आहेत. त्यांची नुकतीच काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ग्रामपंचायत निवडणुकांतही बैरवा यांच्यामुळे पक्षाला फटका बसला होता. आता नगरपालिका निवडणुकीतही त्यांच्यामुळे फटका बसला आहे. अनेक स्थानिक नेत्यांमध्ये बैरवा यांच्याबद्दल नाराजी आहे. बैरवा यांनी नाराज काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्याचीही तसदी घेतली नव्हती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख