पायलट काँग्रेसमध्येच राहणार; चर्चा फेटाळून भाजप नेत्यांना खडसावले - sachin pilot slams bjp leader for interfering in congress party matter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

पायलट काँग्रेसमध्येच राहणार; चर्चा फेटाळून भाजप नेत्यांना खडसावले

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. यावर पायलट यांनी भाजप नेत्यांना जोरदार सुनावले आहे.  

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून मोठा धक्का दिला. त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडमधील जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. यावर पायलट यांनी भाजप नेत्यांना जोरदार सुनावले आहे.  

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

भाजपचे राजस्थामधील आमदार राजेंद्र राठोड यांनी पायलट लवकरच पक्ष सोडतील, अशी भविष्यवाणी वर्तविली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेसला सत्तेपर्यंत पोचवण्यास तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अद्याप त्यांच्याबाबत काँग्रेसने काहीही निर्णय घेतलेला नाही. या ठिणगीची कधीही स्फोट होऊ शकते. कधीही काहीही घडू शकते. 

याला पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी पोकळ विधाने करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या परिस्थितीवर गंभीरपणे विचार करावा. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी आणि मतभेद एवढे वाढले आहेत की त्यांना विरोधी पक्षाचे कामही व्यवस्थितपणे करता येत नाही. चुकीच्या धोरणांमुळे जनतेला संकटात टाकून एकटे पाडणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल. 

हेही वाचा :  पायलट लवकरच भाजपमध्ये दाखल होतील; भाजप नेत्याचा दावा 

दरम्यान, सचिन पायलट यांनीही आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. दहा महिने होऊनही दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. समितीने मला आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण सरकारचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. राजस्थामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाज ऐकला जात नाही, हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी पायलट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. 

गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूष ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख