अखेर ठरलं! पायलट यांना दिल्लीत प्रमोशन अन् समर्थकांना राज्यात मंत्रिपदे

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर लवकरच तोडगा निघणार आहे.
Sachin Pilot
Sachin Pilot Sarkarnama

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर लवकरच तोडगा निघणार आहे. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची गेहलोत यांनी नुकतीच भेट घेतली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी पायलट यांना बोलावून घेऊन सोनिया गांधींनी त्यांच्याशी चर्चा केली होता. यानंतर राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. याचवेळी पायलट यांना दिल्लीत बढती मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पायलट समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर पायलट म्हणाले होते की, आपण सर्वजण काँग्रेसचा भाग आहोत. येथे तुम्ही आणि मी असे काहीही नसते. राज्य मंत्रिमंडळात काही जागा रिक्त आहेत. या जागा भरताना हाय कमांड सर्व बाजूंचा विचार करेल. पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी आशा मला आहे. राज्यात दोन वर्षांत निवडणुका होणार आहेत. राजस्थानमध्ये शक्यतो आलटून पालटून सरकार येत असतात. परंतु, आपल्याला पक्षाला भक्कम करून 2020 मध्ये पुन्हा सत्ता मिळवायची आहे.

Sachin Pilot
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मोदी सरकारनंतर तेल कंपन्यांचंही मोठं पाऊल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सरकारी महामंडळांवरील नियुक्त्या याबाबत सोनिया गांधींनी गेहलोत यांना आदेश दिले आहेत. यानंतर तातडीने पायलट यांना सोनिया गांधींनी भेटीसाठी बोलावले. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये स्थान दिले जाणार आहे. या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. पायलट यांनी वर्षभरापूर्वी पुकारलेल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. ही आश्वासने मिळाल्यानंतर पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केली होती. आता पक्षाने ही आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

Sachin Pilot
प्रदेशाध्यक्ष वेळेत न आल्याने काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदाराने शपथच घेतली नाही!

पायलट यांनी 10 ऑक्टोबरला दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रियांका गांधी, के.सी.वेणूगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. परंतु, राहुल गांधी उपस्थित नव्हते. यानंतर वेगाने चक्रे फिरण्यास सुरवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी गेहलोत यांना मंत्रिमंडळ विस्ताराचा आदेश दिला आहे. पायलट समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून, सरकारी महामंडळांमध्येही काही समर्थकांना स्थान दिले जाणार आहे. यानंतर 24 तासांतच गेहलोत हे दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com