जोतिरादित्य शिंदेंना टक्कर देण्यासाठी सचिन पायलट उतरणार मैदानात

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू आहेत. आता दोन मित्र आमनेसामने येत असल्याने निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.
sachin pilot to campaign for Congress candidates in madhya pradesh bypolls
sachin pilot to campaign for Congress candidates in madhya pradesh bypolls

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. मिनी विधानसभा ठरणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार सामना रंगला आहे. जोतिरादित्य शिंदे हे समर्थकांसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने या पोटनिवडणुका होत आहेत. आता काँग्रेसने शिंदे यांचे मित्र सचिन पायलट यांनाच मैदानात उतरवण्याची खेळी खेळली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील लढतींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला रामराम केल्यानंतर काही काळाने सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. पायलट यांचे बंड शमवण्यात पक्षाला अखेर यश आले होते. आता पायलट यांना थेट मध्य प्रदेशातील रणधुमाळीत उतरवण्याचा मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. 

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये जोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांची नावे अग्रक्रमाने घेतली जात असत. यातील शिंदे हे मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारविरोधात बंड करुन भाजपमध्ये गेले. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले. हे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. शिंदे आणि पायलट हे दोघे मित्र आहेत. काँग्रेसने आता पायलट यांनाच मित्राविरुद्ध मैदानात उतरवण्याची खेळी खेळली आहे. 

पायलट यांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड केले त्यावेळी शिंदे यांनी उघडपणे मित्राची बाजू घेतली होती. काँग्रेस पक्षात तरुणांवर अन्याय होत असल्याची भूमिकाही शिंदे यांनी घेतली होती. आता पायलट हे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी मध्य प्रदेशात येत आहेत. त्यामुळे ते शिंदे यांच्याविरोधात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पायलट हे भिंड, मोरेना आणि शिवपुरी मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. नरवार-शिवपुरी, शैतानबाडा, जोरा, सुमावली, नूराबाद, मानबसाई, गोर्मी आणि गोहड येथे ते 27 आणि 28 ऑक्टोबर प्रचार करणार आहेत. याचबरोबर 28 ऑक्टोबरला त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com