पायलट यांच्यावर कारवाई नाही मात्र, मुख्यमंत्रिपदी गेहलोतच..!

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे असून, विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टला होत असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
sachin pilot camp will support ashok gehlot government is rajasthan
sachin pilot camp will support ashok gehlot government is rajasthan

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. मात्र, पायलट यांच्याबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी यांचाच असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची काल भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्याच्या वाटेवर आहेत.

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतू लागले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली आहे. यामुळे काही बंडखोर आमदार हे गेहलोत यांना भेटले आहेत. त्यांनी गेहलोत सरकारला पाठिंबाही दर्शविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आता पायलट हे समर्थक आमदारांसह ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांना भेटण्यास गेले आहेत. या बैठकीला प्रियांका गांधी याही उपस्थित आहेत. याचवेळी पायलट यांचे स्वागत करण्यास काँग्रेस पक्षातील अनेक नेते सरसावले आहेत. काँग्रेस नेते शशि थरुर यांनी पायलट यांचे पुन्हा पक्षात स्वागत असेल, असे म्हटले आहे. याचवेळी राहुल यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांनीही आनंद व्यक्त केला आहे. राहुल यांचे नेतृत्व आणि प्रियांका यांच्या प्रयत्नांमुळे पायलट पक्षात परत आले, असे त्यांनी म्हटले आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com