कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकारने दुर्लक्ष केल्याने हे संकट; भागवतांनी टोचले कान - rss chief mohan bhagwat slams government over response to covid second wave | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकारने दुर्लक्ष केल्याने हे संकट; भागवतांनी टोचले कान

वृत्तसंस्था
शनिवार, 15 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, केंद्र सरकारला याची हाताळणी करण्यात अपयश आल्याची टीका होत आहे. 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, केंद्रातील भाजप सरकारने सुरवातीला याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. याचबरोबर देशातील जनतेलाही त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. 

कोरोना महामारीच्या काळात जनतेत सकारात्मकता निर्माण करण्यासाठी संघाने पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यात भागवत यांचे आज व्याख्यान झाले. ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर देशातील सर्व घटकांनी दुर्लक्ष केले. यामुळे देश आताच्या वैद्यकीय संकटात अडकला आहे. पहिल्या लाटेनंतर आपण सर्व बेफिकीर झालो. जनता, सरकारे, प्रशासने सगळेच बिनधास्त झाले. आपल्या सगळ्यांना माहिती होते की दुसरी लाट येणार आहे. डॉक्टरांनीही याचा इशारा दिला होता तरीही आपण दुर्लक्ष केले. 

आता कोरोनाची तिसरी लाट येईल, असे सांगत आहेत. आपण तिला घाबरायला हवे की योग्य पद्धतीने कोरोना विषाणूविरोधातील लढाई जिंकायला हवी? आताच्या अनुभवातून धडा घेऊन जनता आणि सरकारने तयार राहायला हवे. या दिशेने संपूर्ण देशाने आता वाटचाल करायला हवी. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आजच्या चुकातून शिकून भारतीयांना आत्मविश्वास पुन्हा कमावावा, असे भागवत यांनी सांगितले. 

कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका देशात तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी सरकारसह जनेतला आता थेट सुनावले आहे. यामुळे संघानेच सरकारच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

देशात 24 तासांत 3 लाख 26 हजार रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 26 हजार 98 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 207 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक धोकादायक; लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी 

मागील 24 तासांत देशात 3 लाख 53 हजार 299 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याच कालावधीत नवीन रुग्णांची संख्या 3 लाख 26 हजार 98 आहे. मागील पाच दिवसांत चार दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक आहे. देशातील महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये 70.49 टक्के बरे होणारे आहेत. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाख 73 हजार 802 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.07 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.83 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख