तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल! मोहन भागवत यांचं वक्तव्य

आपण कितीही चीनविषयी ओरडलो तरी चीनवर अवलंबून राहावे लागेल.
RSS Chief Mohan Bhagwat emphasized on Swadeshi
RSS Chief Mohan Bhagwat emphasized on Swadeshi

मुंबई : आपण तंत्रज्ञान, इंटरनेटचा खूप वापर करतो. पण आपल्या देशात त्याचे मूळ उत्पादन होत नाही. ते बाहेरील देशातून येते. आपण कितीही चीनविषयी ओरडलो तरी चीनवर अवलंबून राहावे लागेल. आपल्या फोनमधील साहित्य चीनमधून येते. त्यामुळं आपण जोपर्यंत चीनवर निर्भर असू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावे लागेल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केलं. (RSS Chief Mohan Bhagwat emphasized on Swadeshi)

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. भागवत म्हणाले, सिकंदरने आक्रमण करण्यापूर्वीही देशावर आक्रमणाचे सावट होते. याला आपण 15 ऑगस्ट रोजी पूर्णविराम दिला. विदेशी आक्रमणं झाल्यानंतर संघर्ष सुरू होत होता. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जे विदेशींच्या हातात होते ते आपले झाले. आपण आपले जीवन चालवण्यासाठी स्वतंत्र झालो.

स्वतंत्र देशाला आता स्वनिर्भर व्हायचे आहे. जितकं स्वनिर्भर बनू तितकंच सुरक्षित राहू. आर्थिक सुरक्षेवर इतर सर्व सुरक्षा अवलंबून आहेत. सरकारचे काम उद्योगांना सहाय्य करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे. देशाच्या विकासासाठी जे आवश्यक आहे त्याचे उत्पादन करण्याचे आदेश सरकारने द्यायला हवेत, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली.  

सर्वांच्या कल्याणाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हाच आपण आनंदी राहू. आनंदी राहण्यासाठी आपल्याला चांगल्या आर्थिक स्थितीची गरज आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याची आवश्यकता आहे. स्वदेशी म्हणजे सगळं काही सोडून देणं असं नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार सुरूच राहील, पण सत्ता आपली राहिल. आपली मर्जी असेल. त्यासाठी स्वालंबन हवे. ते नसेल तर रोजगार जातात. रोजगार गेल्यावर भूख वाढून हिंसा वाढेल, असे सांगत भागवत यांनी स्वदेशीचा नारा दिला.  

विकेंद्रीत उत्पादन प्रक्रियेमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत मिळेल, असे सांगत भागवत म्हणाले, उत्पादन हे जनकेंद्रीत असायला हवे. आपला भर संशोधन आणि विकास, सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आणि सहकारी क्षेत्रांवर केंद्रीत असायला हवा. आपण किती कमावतो यातून आपली जीवनस्तर निश्चित होत नाही तर आपण लोककल्याणासाठी किती परत देतो, यावर जीवनस्तर ठरतो, असंही भागवत यांनी नमूद केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com