रोहित पवारांचा भाजपवर निशाना ; 'जलयुक्त'मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल... - Rohit Pawar criticism on BJP | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवारांचा भाजपवर निशाना ; 'जलयुक्त'मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.

मुंबई :जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली होती. आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. 

याबाबत आमदार रोहित पवार यांनी टि्वट केलं होतं. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.

ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

कोरोनातील अपयश समोर आल्याने आणि मेट्रो कारशेडचं पितळ उघड केल्याने सरकारमध्ये पोटशूळ निर्माण झाला व त्यातूनच जलयुक्त शिवार योजनेवर अविश्वास दाखविण्यात आला. चौकशी जरूर करा, पण या योजनेला मोठ्या प्रमाणावर मिळालेला जनसहभाग पाहता ही चौकशी म्हणजे जनतेवरील अविश्वासच आहे, असेही दरेकर म्हणाले. 

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय फक्त राजकीय अभिनिवेशातून घेतला आहे. ही चौकशी म्हणजे या योजनेची बदनामी करून विदर्भ, मराठवाडा व खानदेशाचा हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा डाव आहे. जलयुक्त शिवार हा कोरडवाहु शेतकऱ्यांसाठी राबवलेला उपक्रम आहे. यापूर्वीही यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असता न्यायालयानेही योजना चांगली असल्याचे नमूद केले आहे, असेही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

शाश्वत शेतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यात राबविण्यात आहे. या उपक्रमाला मोठ्याप्रमाणात लोकसहभाग देखील लाभला. राज्यात भूजल पातळी किती प्रमाणात वाढली आहे, याची सर्व माहिती सरकारने जरूर जनतेसमोर आणावी. पण लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच हे चालले आहे, हे न कळण्याएव्हढी जनता दुधखुळी नाही, अशीही टीका दरेकर यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख