"अे.यू म्हणजे आदित्य ठाकरे नव्हे. : रिया चक्रवर्ती - Riya said, "AU is not Aditya Thackeray." | Politics Marathi News - Sarkarnama

"अे.यू म्हणजे आदित्य ठाकरे नव्हे. : रिया चक्रवर्ती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

"अे.यू म्हणजे माझी मैत्रिण अनाया उदास हिचे नाव आहे, आदित्य उद्धव नव्हे."  

मुंबई : "अे.यू म्हणजे आदित्य ठाकरे नव्हे," असा खुलासा अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे रिया चक्रवर्तीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती. याबाबत रिया म्हणाली "अे.यू म्हणजे माझी मैत्रिण अनाया उदास हिचे नाव आहे, आदित्य उद्धव नव्हे." मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, असेही रिया चक्रवर्तींने म्हटले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. आता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रियाला या प्रकरणी सातत्याने लक्ष्य केले जात असून, आता रियाच्या समर्थनासाठी नेटिझन्स रिंगणात उतरले आहेत. 

या प्रकरणी रिया चक्रवर्ती हिला लक्ष्य करण्यात येत आहे. तिच्यावरील गुन्हा सिद्ध होण्याआधी काही वृत्तवाहिन्या ती दोषी असल्याचे दाखवत आहेत. यावरुन आता रियानेही मौन सोडून थेट भूमिका मांडली आहे. यानंतर आता रियाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आहे. यामुळे एवढे दिवस सुशांतला न्याय मिळावी, अशी मागणी करणारे नेटिझन्स आता रियाला न्याय मिळावा ही  मागणी करु लागले आहेत. यामुळे आज ट्विटरवर #JsuticeForRhea हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. रियाला कोणत्याही पुराव्याशिवाय या प्रकरणी खलनायिका ठरवण्यात आल्याने तिच्या बाजूने आता नेटिझन्स मैदानात उतरत आहेत. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ आणि नीरज या दोघांची सीबीआयने आधी चौकशी केली आहे. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही चौकशी करण्यात आली. सुशांतकडे घरकाम करणाऱ्या दीपेश सावंत यांचीही चौकशी सीबीआयने केली होती. काल सीबीआयने रियाचा भाऊ शोविक याची आठ तास चौकशी करुन त्याचा जबाब  नोंदवला होता. रिया चक्रवर्ती हिची आज सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. याचबरोबर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांचीही चौकशी सुरू आहे.  

Edited  by : Mangesh Mahale      
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख