कोरोनात भारत 'नंबर वन' ही मोदींसाठी गौरवाची बाब; काँग्रेसचे प्रत्युत्तर - rising covid 19 cases in india is proud moment for narendra modi says congress | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनात भारत 'नंबर वन' ही मोदींसाठी गौरवाची बाब; काँग्रेसचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे राजघाटावर उद्घाटन झाले. या वेळी मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. याला आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.  
 

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांनी केलेल्या चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी यांची राजघाटावर समाधी असून, याच ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या  वेळी मोदी यांनी देशातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन आधीच्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला लक्ष्य केले. आता देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन  काँग्रेसने मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्षे झाल्याचेही निमित्त होते. राजघाटावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वेळी मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेवरील लघुपटही पाहिला. राष्ट्रीय स्वच्छता केंद्रातून डिजिटल आणि बाह्य इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून स्वच्छताविषयक माहिती, जनजागृती आणि शिक्षण आदी गोष्टी केल्या जातील. 

या वेळी बोलताना मोदी यांनी आधीच्या काँग्रेसप्रणित यूपीए सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कोरोनासारखे संकट 2014 च्या आधी आले असते तर काय घडले असते याचा विचार करा. आपण लॉकडाउन यशस्वीपणे राबवू शकलो असतो का? त्यावेळी 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या उघड्यावर  शौचास जात होती. स्वच्छाग्रहामुळे आपण या कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यास सक्षम बनलो आहोत. 

देशात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत. या मुद्द्यावरुन सरकारला काँग्रेस धारेवर धरत आहे. मोदींनी काँग्रेसला स्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही याला उत्तर दिले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात आढळले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारची टाळी, थाळी आणि पापड यासारखी आयुधे सरकारलाच भारी पडत आहेत. कोरोनाच्या बाबतीत आपण सर्वांनाच मागे टाकले आहे. कोरोनाच्या बाबतीत आपण प्रथम क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. ही भाजप आणि मोदींसाठी गौरवाची बाब असेल. मोदी या परिस्थितीलाच चांगली स्थिती म्हणत आहेत.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख