कोण आदित्य ठाकरे? मी त्यांना ओळखत नाही; रिया चक्रवर्तीचा दावा - rhea chakraborty claims she doesnt know shivsena leader aditya thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

कोण आदित्य ठाकरे? मी त्यांना ओळखत नाही; रिया चक्रवर्तीचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. या प्रकरणी रोजरोज नवनवीन बाबी समोर येत असून, गुंतागुंत आणखी वाढत आहे. 

दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी)  चौकशी सुरू केली असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने शिवसेना नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे.  

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी या प्रकरणी रियाच्या वतीने एक निवेदन जाहीर केले असून, त्यात म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना रिया ओळखत नाही. तसेच, ती त्यांना कधीही भेटलेली नाही. याचबरोबर तिने आदित्य यांच्याशी कधी फोनवरुनही बोलणे केलेले नाही. तिने केवळ आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते असल्याचे ऐकले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी केलेले आरोप निराधार आहेत. 

या प्रकरणी रियानेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही तिने सीबीआय चौकशीची विनंती केली होती. तिने बिहारमध्ये बेकायदा पद्धतीने एफआयआर दाखल करण्यास आक्षेप नोंदवला असून, बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, असे मानेशिंदे यांनी नमूद केले.

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख