गृहमंत्री देशमुखांवरील आरोपांची चौकशी करणार निवृत्त न्यायाधीश चांदीवाल - retired high court judge u k chandiwal will probe allegations against anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री देशमुखांवरील आरोपांची चौकशी करणार निवृत्त न्यायाधीश चांदीवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती जाहीर केली आहे. 

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. परमबीरसिंह पत्रात केलेल्या आरोपांच्या चौकशीबरोबरच ही समिती अधिकाऱ्यांसह गृहमंत्र्यांकडून कोणत्या प्रकारची गैरवर्तणूक झाली का याचीही चौकशी करेल. 

चांदीवाल चौकशी समिती आरोप झालेले गृहमंत्री, मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह या प्रकरणाशी निगडित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करेल. या चौकशीत मंत्री अथवा अधिकारी-कर्मचारी दोषी आढळल्यास ही समिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणांकडे हा तपास सोपवण्याची शिफारस करेल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच, गृह विभागाशी संबंधित शिफारशीही ही समिती करणार आहे. 

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करेल. 

हेही वाचा : चिप पब्लिसिटी...गृहमंत्री देशमुखांविरुद्धच्या याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

परमबीरसिंहांच्या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांकडून सरकारवर दबाव वाढला होता. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानुसार अखेर निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख