नितीशकुमार अन् भाजपमध्ये पडली आरक्षणाची ठिणगी..! - reservation issue show differences between nitish kumar and bjp | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार अन् भाजपमध्ये पडली आरक्षणाची ठिणगी..!

वृत्तसंस्था
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. याचबरोबर आघाड्यांमधील कुरबुरीही समोर येऊ लागल्या आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांची सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. आता भाजप आणि जेडीयूतील मतभेद समोर येऊ लागले आहेत. याला कारण आहे नितीशकुमारांनी उपस्थित केलेला आरक्षणाचा मुद्दा. या मुद्द्यावर आता भाजपमध्ये मोठी अस्वस्थता जाणवू लागली आहे. 

काही दिवसांपूर्वी पश्चिमी चंपारणमधील वाल्मिकीनगरमध्ये नितीशकुमार यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेतली होती. अल्पसंख्याक समुदायांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अशी भूमिका घेतली. त्यांनी म्हटले होते की, सरकार अशा आरक्षणाच्या बाजूने आहे. परंतु, हे नवीन जणगणनेच्या आकडेवारीनंतरच होऊ शकेल. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी जनगणना करावी लागेल. मात्र, जनगणना करण्याचा अधिकार आमच्या हाती नाही. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात जातीनिहाय आरक्षण हवे आहे. 

जातीआधारित जनगणना करण्याची मागणी नितीशकुमार यांनी याआधी वारंवार केली आहे. मात्र, त्यांनी आता बोलताना जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचा उल्लेख केलेला नाही. यानंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपचा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, पक्ष कोणतेही घटनाबाह्य पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने जनगणना 2021 चा पहिला टप्पा पुढे ढकलला आहे. तो 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान होणार होता. या जनगणनेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, ती यावर्षी होण्याची शक्यता नाही. 

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, असा ठराव बिहारच्या विधानसभेने फेब्रुवारीमध्ये संमत केला होता. त्यावेळी नितीश यांनी देशात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. याचबरोबर त्याआधी 12 महिन्यांपूर्वी बिहारच्या विधानसभेने हाच ठराव संमत केला होता. याआधी देशात जातीनिहाय जनगणना नऊ दशकांपूर्वी झाली होती. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख