संजय राऊत म्हणाले, "माफी मागण्याचा विचार करेन.." - Raut said, "I will consider apologizing." | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणाले, "माफी मागण्याचा विचार करेन.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिसच सक्षम आहे. ते हा तपास पुढे नेतील. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई :"सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत माफी मागण्याच्या विचार करेन, प्रसारमाध्यमांनी यात पडू नये," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. इथं जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जातंय. सुशांतसिंह प्रकरणात राजकारन न करता, राज्य, देश कसा पुढे जाईल, याचा विचार आपण केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

सुशांतसिंह प्रकरणामुळे राज्य सरकार अस्थिर असून ते पडेल का या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणले, "सरकार अजिबात अस्थिर नसून ते पडणार नाही. जर असे झाले तर अगोदर केंद्र सरकार पडेल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिसच सक्षम आहे. ते हा तपास पुढे नेतील. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या नोटिशीची मला कल्पना नाही. आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही सर्व एक आहोत, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

संजय राऊत यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांबद्दल त्यांना सुशांतचे चुलतभाऊ आमदार नीरज सिंह यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. राऊत यांनी आपण केलेल्या वक्तव्यांबद्दल येत्या ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.  संजय राऊत यांनी 'सामना'च्या आपल्या 'रोखठोक' या सदरात सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते.  

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संजय राऊत यांची भाषा असंसदीय असल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही केला आहे. राऊत यांनी तथ्य जाणून न घेता आपल्यावर व सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले, असे पांडे यांनी म्हटले होते. एका जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करणे योग्य नाही, असेही पांडे म्हणाले होते. 
Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख