राजनाथसिंहजी, जरा क्रोनोलॉजी तो समझा करो!

सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरून वाद...
राजनाथसिंहजी, जरा क्रोनोलॉजी तो समझा करो!
Rajnath Singh

मुंबई : महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) सांगितल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer savarkar) इंग्रजांकडे दया याचिका केली होती, असं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. राजनाथसिंहजी, (Rajnath Singh) जरा क्रोनोलॉजी तो समझा करो, असा टोला लगावत महाजन यांनी याबाबत काही दाखले देत गांधीजींनी सावरकरांना माफी मागण्यास सांगितले नव्हते, असं सांगितलं आहे.

सावरकरांविषयीच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी मंगळवारी हे वक्तव्य केलं आहे. यावर महाजन यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांचा दावा खोडून काढला आहे. तसेच त्यांनी याबाबत ट्विटही केले आहे. सत्य-असत्याची‌ बेमालूम भेसळ करून धादांत खोटा इतिहास लोकांना सांगण्याच्या संघाच्या जुन्या सवयीनुसार भागवतांनी 'गांधींच्या सांगण्यानुसार सावरकरांनी माफी मागितली' असे निखालस खोटे विधान ठोकून दिले आहे, असे महाजन यांनी म्हटलं आहे.

Rajnath Singh
महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली माफी!

महाजन पुढे म्हणतात की, 'निष्ठावान' स्वयंसेवक राजनाथसिंह यांनीही तीच री ओढली आहे. कालानुक्रमे हे विधान अनैतिहासिक आहे. सावरकर १९११ साली अंदमानच्या तुरुंगात गेले तेंव्हापासून एक महिन्याच्या आत त्यांनी माफीपत्र लिहून दिले. त्यानंतर लागोपाठ ठराविक कालावधीनंतर सहा माफीपत्रे लिहिली. गांधीजी १९१५ साली भारतात आले. दोन वर्षांनी ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.

गांधीजींनी सावरकरांना माफी मागण्यास सांगितले तर मग त्यांनी स्वतः आयुष्यात एकदाही माफी का मागितली नाही?संघाच्या मुसलमान विषयक दृष्टीकोनातही असाच गोंधळ त्यांच्या परस्पर विरोधी विधानातून दिसून येतो. प्रत्यक्षात, सावरकर व संघ यांच्यातून‌ विस्तवही जात नव्हता हे गोळवलकरांच्या विधानावरून दिसून येते, असं महाजन यांनी नमूद केलं आहे.

काय म्हणाले राजनाथसिंह?

इंग्रजांच्या कैदेत असताना सावरकर यांनी दया याचिका केली होती. त्यांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा दावा केला जातो. त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सावरकरांविषयी खोटी माहिती पसरवली जात आहे. सतत हे सांगितलं जातं की, सावरकरांनी इंग्रजांसमोर दया याचिका दाखल केली होती. पण खरं हे आहे की, त्यांनी स्वत:ची सुटका व्हावी म्हणून ही याचिका दाखल केली नव्हती. सर्वसाधारणपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार महात्मा गांधींनी सांगितल्यामुळे सावरकरांनी ही याचिका केली होती, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

मार्क्सवादी व लेनिनवादी विचारधारा असलेल्या लोकांनी सावरकरांना बदनाम केल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. सावरकरांवर केली जात असलेली टीका तथ्यहीन आहे. सावरकर हे देशाचे पहिले संरक्षण तज्ज्ञ होते. इतर देशांसोबत कसे संबंध असायला हवेत, यावर सावरकरांचे धोरण अगदी स्पष्ट होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in