कोरोना, मोदी सरकार अन् योगींमुळे 'दक्ष' झालेल्या संघ नेतृत्वाची बैठक सुरू - Rashtriya Swayamsevak Sangh top brass meet starts form today in new delhi | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना, मोदी सरकार अन् योगींमुळे 'दक्ष' झालेल्या संघ नेतृत्वाची बैठक सुरू

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाची अनौपचारिक बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेतृत्वाची अनौपचारिक बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), सरकार्यवाह दत्ताजी होसबळे, ज्येष्ठ संघ नेते भैय्याजी जोशी यांच्यासह पाचही सहसरकार्यवाह या बैठकीला हजर आहेत. या बैठकीत कोरोना संकटाच्या हाताळणीतील मोदी सरकार (Narendra Modi) व भाजपशासित राज्यांचे दोष आणि उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. त्याआधी वर्षभऱ दिल्लीत संघाने ही बैठक घेण्यामागील कारण गंभीर असल्याचे मानले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनाही या बैठकीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत देशाची सद्य:स्थिती व  भाजप सरकारच्या कामगिरीवर चर्चा होते. या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर पश्चिम बंगालमधी विधानसभा निवडणुकीनंतरचा हिंसाचार व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा हे विषय प्राधान्यक्रमाने आहेत. 

हेही वाचा : खासदार मुकुल रॉय यांच्या घरवापसीची चर्चा अन् थेट मोदींचा फोन

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. त्यामुळे संघाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. 

नुकतीच होसबळे व भाजपचे संघटनमंत्री बी एल संतोष यांनी लखनौमध्ये योगींसह त्यांच्या सरकारचे मंत्री, आमदार, संघनेते यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेची माहिती संघनेतृत्वाला दिली जाणार आहे. नंतर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाशी चर्चा करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत संघाच्या रणनीतीची आखणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधी काही महिने नोटाबंदी करण्यात आली होती. त्याचा फटका भाजपला बसेल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात भाजपला चांगला विजय मिळाला. योगी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून भाजपमधील अंतर्गत वादांमुळे जनतेची नाराजी आहे. अशाही परिस्थितीत योग्य आखणी केली तर विजय अशक्य नाही, असे संघाचे मत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख