भाजपची सर्व पदे दानवेंच्या घरातच; लोणीकर झाले आक्रमक - raosaheb danve is acting like dictator said bjp workers from jalna | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपची सर्व पदे दानवेंच्या घरातच; लोणीकर झाले आक्रमक

लक्ष्मण सोळुंके
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पक्षातील नेत्यांनीच थेट भूमिका घेतली आहे. दानवे यांच्यामुळेच पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. 

जालना :  जालना जिल्ह्यात भाजप नेते व  केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे हे हुकूमशाही गाजवत असल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपमध्ये हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, दानवे यांच्या हुकूमशाहीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी केला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात दानवे गटाविरुद्ध आमदार बबनराव लोणीकर गट असा संघर्ष पेटला आहे. या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू असून, यात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. 

रावसाहेब दानवे यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे जालना जिल्हा परिषद दोन वेळा भाजपच्या ताब्यात आली नाही. ते स्वतः केंद्रीय मंत्री, मुलगा जिल्हाध्यक्ष आमदार,  भाऊ पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांसह अनेक महत्वाची पदे  त्यांनी घरातच ठेवली आहेत, असा गंभीर आरोप ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री दानवे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये राहावे की नाही हे एकदा स्पष्ट करावे, असा उद्विग्न सवालही शेजुळ यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत चालली असून, त्यांच्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीच्या माध्यमातून भाजपचे अतोनात नुकसान होत आहे. रात्रंदिवस पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर डावलले जात आहे. आपल्या मर्जीतील आणि हुजरेगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांना आणि आपल्याच कुटुंबातील लोकांना पक्षात महत्वाची  पदे दिली जात आहेत, असे शेजुळ यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलायचा का ? असा सवालही त्यांनी केला.

दानवे यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या आरोपांमुळे आज मंठा आणि परतूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आमदार बबनराव लोणीकर यांनी बोलावली आहे. यात कार्यकर्ते  आणि लोणीकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. कार्यकारिणीच्या पद वाटपात अन्याय झाल्याच्या या आरोपावरून जिल्ह्यात लोणीकरविरुद्ध दानवे वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दानवे विरुद्ध लोणीकर वादावर राज्यातील भाजप नेतृत्वही लक्ष ठेवून आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख