सुरजेवाला म्हणाले, सिब्बल तुम्ही दिशाभूल करु नका... - randeep surjewala slams kapil sibal over comment on rahul gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

सुरजेवाला म्हणाले, सिब्बल तुम्ही दिशाभूल करु नका...

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली असून, पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यांवरुनच ही बैठक गाजली आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. बैठकीतील इतर विषयांपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. यावर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले. नंतर राहुल गांधी असे काही बोललेच नसल्याचे स्पष्ट झाले असून, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सिब्बल यांनी लक्ष्य केले आहे. 

कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर म्हटले होते की, मी आतापर्यंत कधीही भाजपच्या बाजूने बोललो नाही. तरीही राहुल गांधी म्हणतात की आम्ही भाजपसोबत संगनमत करीत आहोत. आम्ही भाजपशी संगनमत केले तर राजस्थान उच्च न्यायालयात आणि मणिपूर उच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडून कोणी सरकार वाचविले होते. गेल्या 30 वर्षांत मी भाजपच्या बाजूने कधीच विधान केलेले नाही. तरीही आम्ही भाजपशी संगनमत करीत आहोत! 

सिब्बल यांच्या ट्विटचा रणदीप सुरजेवाला यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कृपया माध्यमांतील खोट्या बातम्यांवरुन दिशाभूल करु नका. आपण सर्वांना मोदींच्या जुलमी राजवटीविरोधात एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे करण्यापेक्षा सरकारशी लढा. 

सिब्बल यांच्या ट्विटवरुन मोठा गदारोळ उडाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: सिब्बल यांच्याशी चर्चा केली. यानंतर सिब्बल यांनी अखेर ट्विट मागे घेतले. याचबरोबर सिब्बल यांनी जाहीर खुलासा करुन या मागील कारण स्पष्ट केले.   

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक आज झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या व्हर्च्युअल बैठकीला सोनिया गांधी, डॉ.मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, अमरिंदरसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, पी.एल.पुनिया, के.सी.वेणूगोपाल आणि ए.के.अँटनी यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. आजच्या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

 Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख