चीनला सडेतोड उत्तर कधी देणार..? मोदींना काँग्रेसचा सवाल  - Randeep Singh Surjewala criticizes Prime Minister Narendra Modi  | Politics Marathi News - Sarkarnama

चीनला सडेतोड उत्तर कधी देणार..? मोदींना काँग्रेसचा सवाल 

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सीमेवर चीनी लष्कराने उल्लंघन केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. भारतीय लष्करानं त्यांना सडेतोड उत्तर दिले असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. चीनला सडेतोड उत्तर नरेंद्र मोदी कधी देतील, असा प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सुरजेवाला यांनी टि्वट केलं आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "आए दिन हमारी सरज़मीं पर क़ब्ज़े का दुस्साहस, आए दिन देश की धरती पर चीनी घुसपैठ, मोदी जी, पर “लाल आँख” कहाँ हैं, चीन से आँखों में आँखें डाल कब बात होगी, पी.एम मौन क्यों हैं?

 
काँग्रेसचे नेता जयवीर शेरगिल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की भाजप अन्य विषयावर सोशल मीडियावर विरोध करण्यास पुढे असतात. पण जेव्हा चीनच्या विषय येतो तेव्हा भाजप माघार घेतो. या विषयावर भाजपची पत्रकार परिषद कधी होईल. चीनबाबत सरकार कठोर पावलं कधी उचलणार. चीनचे नाव घ्यायला सरकारला भीती वाटते का ?
 
पॅनगाँग त्सो तलावाजवळ चिनी सैन्यांचे आक्रमण भारतीय सैन्याने थांबवले आहे, अशी माहिती लष्कराचे पीआरओ कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी चुशूल येथे ब्रिगेड कमांडर स्तराची फ्लॅग मीटिंग सुरु आहे, अशी माहिती लष्कराचे पीआरओ कर्नल अमन आनंद यांनी दिली.

भारतीय लष्कराच्या माहितीनुसार 29 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना झाली. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच पीएलएने सीमेवरील स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क भारतीय सैनिकांनी त्यांचा डाव हाणून पाडला, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. याबाबत भारतीय लष्करातर्फे पीआयबीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पँगाँग तलाव परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, चिनी सैनिकांना भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांचे आक्रमण थांबवले आहे. भारतीय सैन्य चर्चेच्या माध्यमातून शांतता पुनर्स्थापित करण्याच्या पक्षात आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या प्रदेशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे. या संपूर्ण वादावर ब्रिगेड कमांडर स्तरावर बैठक सुरु आहे.
 
भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून चिनी सैनिकांच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. सीमेवरील स्थिती निवळावी यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर विविध बैठका झाल्या.  
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख