मनसेचा जुना भिडू भाजपमध्ये आक्रमक 

 मनसेचा जुना भिडू भाजपमध्ये आक्रमक 

मुंबई : मनसेमध्ये काहीकाळ राहून आमदारीची एक टर्म पूर्ण केलेले आमदार राम कदम त्यांच्या आक्रमक स्टाइलमुळे तेव्हा चांगलेच "नावारूपाला" आले होते. सन 2014 मध्ये कदम भाजपमध्ये दाखल झाले. आमदार म्हणून निवडूनही आले. मनसेमध्ये होरपळलेल्या कदम यांनी भाजपमध्ये मात्र "थंडा करके खाओ" अशी भुमिका घेतली होती. पण गेल्या दोन दिवसांत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांवर टीका केली आहे. त्यामुळे आमदार कदम भाजपमध्ये आक्रमक होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. 

दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर मुसळे या तरूणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली होती. या थरारनाट्यामुळे सरकारचेही धाबे दणाणले होते. "मुसळे हा तरूण राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हे कारस्थान आहे" असा आरोप करून आमदार राम कदम यांनी भाजपप्रणीत राज्य सरकारची बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न केला. 

आज पुन्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावरही राम कदम यांनी टीकास्त्र सोडले. गुंतवणुकीच्या बाबतीत सावंत यांनी महाराष्ट्राची तुलना कर्नाटकसोबत केली होती. त्यामुळे सावंत हे महाराष्ट्राद्वेष्ठे आहेत, अशी टीका कदम यांनी केली होती. 

सलग दोन दिवस विरोधी पक्षांवर राम कदम तुटून पडले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षावर तुटून पडण्याचा "वरून आदेश" आला आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

Related Stories

No stories found.