मोठी बातमी : कृषी, कामगार विधेयकांना मंजुरी मिळाली अन् सरकारने अधिवेशनच गुंडाळले

देशभरात कृषी विधेयकांवरुन गदारोळ उठलेला असताना सरकारने कामगार कायदा दुरुस्ती विधेयके आज संमत करुन घेतली. यानंतर सरकारने अधिवेशनच अनिश्चित काळासाठी तहकूब केले आहे.
Rajys Sabha and Lok Sabha adjourned sine die in the wake of COVID19 pandemic
Rajys Sabha and Lok Sabha adjourned sine die in the wake of COVID19 pandemic

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावर राज्यसभा आणि लोकसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आता सरकारने यावर कडी करत राज्यसभा आणि लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली आहे. सरकारने यासाठी संसदेतील कोरोनाचा वाढत्या प्रसाराचे कारण दिले असले तरी विरोधकांच्या बहिष्काराचे अस्त्र निकामी करणे हा यामागील खरा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकारने महत्वाची विधेयके संमत करुन अखेर अधिवेशन गुंडाळले आहे. 

संसद अधिवेशनाच्या सुरुवातीपासून कोरोनाचे सावट कायम आहेत. यासाठी सर्व मंत्री आणि खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात अनेक खासदार पॉझिटिव्ह आढळले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावणारे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे नंतर पॉझिटिव्ह आढळले होते. तरीही भाजप सरकारने अधिवेशनाचे कामकाज सुरूच ठेवले होते. सरकारने कृषी विधेयकांसह कामगार कायद्यातील दुरुस्तीची महत्वाची विधेयके संसदेत सुरू असलेल्या गदारोळात मंजूर करुन घेतली आहेत. ही विधेयके मंजूर झाल्यानंतर सरकारने आता अधिवेशन गुंडाळले आहे. अधिवेशन 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार होते. परंतु, कोरोनाचे कारण देत ते मध्येच गुंडाळले आहे. 

आता कृषी विधेयकांवरुन सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. याचबरोबर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील शिरोमणी अकाली दल या मुद्द्यावर सरकारमधून बाहेर पडले आहे. याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे बिजू जनता दलही सरकारच्या विरोधात गेले आहे. घटक पक्षांची वाढती नाराजी आणि एकवटणारे विरोधक या पार्श्वभूमीवर सरकारची कोंडी झाली आहे. सरकारने राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चिच काळासाठी तहकूब करुन या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याने विरोधकांच्या आंदोलनाची धारही कमी होईल, असा सरकारचा कयास आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांच्या दालनात राज्यसभा कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षीय खासदार महात्मा संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमले. त्यांच्या हातात 'किसान बचाव'  यासारखे फलक विविध भाषांमध्ये लिहिलेले होते. आझाद, पटेल, डेरेक ओब्रायन, तिरूची सिवा, रामगोपाल यादव,, ए करीम, केके रागेश, आनंद शर्मा ,राजीव सातव, वंदना चव्हाण, फौजिया खान, कुमार केतकर आधी खासदार पुतळ्यापासून पदयात्रेने आकारांच्या पुतळ्याजवळ गेले आणि तेथून माघारी फिरले. यावेळी घोषणाबाजी कटाक्षाने टाळण्यात आली होती आणि सर्वजण शांतपणे चालत होते. 

राज्यसभेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करीत संसद अधिवेशनावर बहिष्कार टाकणार्‍या राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या सुमारे शंभर खासदारांनी आज संसदेच्या आवारातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात मूक पदयात्रा काढली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून या कायद्यांवर स्वाक्षरी न करता ते राज्यसभेकडे परत पाठवावेत, असे साकडे विरोधी पक्षीय खासदारांनी घातले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com