सुशांतनंतर आता हरिवंश बनले बिहारमधील निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा!

कृषी विधेयकांवरुन देशात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आता निलंबित आठ खासदारांचा मुद्दा गाजू लागला असताना बिहारमध्ये मात्र, वेगळ्याच कारणावरुन वातावरण तापवले जात आहे.
rajya sabha deputy chairman harivansh is now issue in bihar assemble election
rajya sabha deputy chairman harivansh is now issue in bihar assemble election

नवी दिल्ली : कृषी विधयेकांवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष मैदानात उतरले आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या आठ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरुन देश पातळीवर गदारोळ सुरू असताना बिहारमध्ये मात्र, हरिवंश यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुका याला कारणीभूत आहेत. सुशांतसिंह राजपूत यांच्यानंतर आता हरिवंश यांचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) या तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा बिहारमधील सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीय) आणि भाजपने लावून धरला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने या मुद्द्यावरुन मोहीम उघडली आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत: सुशांत प्रकरणी लक्ष घातले होते. बिहारमध्ये नोव्हेंबरच्या सुमारास विधानसभा निवडणुका होत आहेत. कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनने बिहारमधील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी पोचले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारमोर आहे. याचवेळी राज्यात पुराने थैमान घातले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदत आणि पुनर्वसनाच्या पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार नवनवीन मुद्दे शोधत आहे. 

यामुळे बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत. 

आता राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश हे चर्चेत आले आहेत. हरिवंश हे बिहारचे असून, ते जेडीयूचे आहेत. साहजिकच त्यांचा अपमान झाल्याची ओरड जेडीयूकडून सुरू करण्यात आली. बिहारच्या पुत्राचा अपमान झाला असून, तो सहन केला जाणार नाही, अशा गर्जनाही करण्यात येत आहेत. यात भाजपही मागे राहिला नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कृषी विधेयकांवरुन झालेल्या गोंधळाचे राजकारण करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, असे म्हणत असतानाच त्यांनी हरिवंश यांना बिहारचा अभिमान असे संबोधले आहे. बिहारच्या व्यक्तीचा अपमान झाला असून, बिहारमधील जनता याला योग्य उत्तर देईल, असे म्हटले आहे. 

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांचे कौतुक केले. या कौतुकातून बिहारी जनतेला खूष करण्याचा त्यांच्या मनोदय लपून राहिलेला नाही. याआधी मोदी यांनी हरिवंश यांच्या बिहारमधील असण्याचा गौरव केला होता. यामुळे हरिवंश हे केवळ उपसभापती राहिले नाहीत तर बिहारच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा बनले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com