राजू शेट्टी म्हणाले, "मंत्री गावात आला..त्याला दूधाने अंघोळ घाला" - Raju Shetty warns ministers | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टी म्हणाले, "मंत्री गावात आला..त्याला दूधाने अंघोळ घाला"

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

मंत्री गावात आला तर त्याला दूधाने अंघोळ घाला" असे राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

बारामती : दुधदरवाढीबाबत बारामतीमध्ये आज माजी खासदार राजू शेट्टीं यांचं आंदोलन झालं. यावेळी "जो पर्यंत सरकार निर्णय बदलत नाही, तो पर्यंत जर कोणी मंत्री गावात आला तर त्याला दूधाने अंघोळ घाला" असे राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

याशिवाय शरद पवारांनी यात मध्यस्थी करावी, अशीही मागणी राजू शेट्टी यांनी बारामतीत केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्रातील 18 टक्के दूध हे सरकारात आहे. 82 टक्के दुध हे खासगी क्षेत्रात आहे. दुध पुरविणाऱ्या उत्पादकाला थेट अनुदान देणं हाच त्याला पर्याय आहे. 

दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरुन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज बारामतीत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पध्दतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ....असे सुरु आहे...अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना लक्ष्य केले. 

बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेट्टी म्हणाले, अनेक दूध संघ कागदावरचे असून यांचे लेखापरीक्षण करावे, मी आव्हान देऊन सांगतो 6 एप्रिलपूर्वी यांच्या डेअरीत दूध किती होते ते दाखवावे, 18 रुपयांनी अगदी परराज्यातूनही दूध विकत घेऊन सरकारला ते 25 रुपये लिटरने विकले आहे. सरकारी दूधखरेदी योजना सुरु झाल्यावरच यांचे दूध कसे वाढले, कागदी मेळ करुन सरकारी तिजोरी लुटण्याचे काम झालेले आहे. यात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. हे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उघड्या डोळ्याने पाहत असतील तर उद्धवसाहेब दूध उत्पादकांनी हातात लोढण का घेऊ नये याचे उत्तर तुम्ही मला द्या, असा सवाल शेट्टी यांनी केला. 

सरकारी खरेदी होऊनही दूधाचे भाव वाढत नसल्याने ही उत्पादकांची फसवणूकच असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टी यांनी विविध ठिकाणच्या दूध संघांनी दिलेल्या भावांची आकडेवारीच वाचून दाखवली. गोमूत्र व शेणालाही दूधापेक्षा अधिक दर मिळतो, पाण्याची बाटलीही दूधापेक्षा महाग आहे, ही बाब राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी, अशी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत, दूध उत्पादकांच्या हक्काचा पैसा लुटला जात असल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले. 

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनीही सविस्तर आकडेवारी मांडून दूध उत्पादकांना पाच रुपयांचे अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगितले. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही घामाचा दाम मागतोय, वेळ पडली तर जहाल आंदोलन उभे करु, असा इशारा त्यांनी दिला. दशरथ राऊत यांनीही या प्रसंगी आपल्या व्यथा मांडल्या.  
Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख