उत्तर प्रदेशच्या मदतीसाठी राजनाथसिंह धावले; 'डीआरडीओ'कडून 150 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर - rajnath singh directs drdo to supply 150 jumbo oxygen cylinder to utter pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

उत्तर प्रदेशच्या मदतीसाठी राजनाथसिंह धावले; 'डीआरडीओ'कडून 150 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर

वृत्तसंस्था
सोमवार, 19 एप्रिल 2021

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशात काल तब्बल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशात काल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे उत्तर प्रदेशच्या मदतीला धावून गेले आहेत. त्यांच्या निर्देशानंतर उत्तर प्रदेशला 'डीआरडीओ'कडून 150 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मिळाले आहेत. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) उत्तर प्रदेशला 150 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत. आज हे सिलिंडर उत्तर प्रदेश सरकारच्या हवाली करण्यात आले. डीआरडीओ आणखी एक हजार ऑक्सिजन सिलिंडर उत्तर प्रदेशला देणार आहे. लखनौमधील रुग्णालयांना या सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. 

राजनाथसिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते एकदा गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून तर दोन वेळा लखनौ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सध्या ते लखनौ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी दोन वेळा भूषवले आहे. त्यांनी आता उत्तर प्रदेशातील भाजप सरकारसह लखनौ मतदारसंघाला संकटाच्या काळात ऑक्सिजन सिलिंडरची मोठी भेट दिली आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. 

हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह भावासाठी केंद्रीय मंत्रीच झाला हतबल 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत दर रविवारी लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 50 हजार 33 आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 91 हजार 457 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 830 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात काल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल देशभरात 1 हजार 619 जणांचा काल कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 29 हजार 329 आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख