राजस्थानमध्ये पायलट यांचे बंड फसले की भाजपची खेळी फसली..?

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे असून, विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टला होत असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
rajasthan political crisis is finally win for ashok gehlot and loss for bjp
rajasthan political crisis is finally win for ashok gehlot and loss for bjp

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. मात्र, या निमित्ताने पायलट यांचे बंड फसले की भाजपची खेळी फसली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची काल भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

आता या निमित्ताने पायलट यांचे बंड फसले की भाजपची खेळी फसली, असा प्रश्न उपस्थित आहे. पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर ते 18 समर्थक आमदारांसह हरियानात गेले होते. भाजपची सत्ता असलेल्या हरियानात ते आश्रयाला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणी भाजपने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या होत्या. याचवेळी गेहलोत यांचे ज्येष्ठ बंधूंच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू झाला. ईडीचे हे टायमिंगही चर्चेचा विषय ठरले होते. 

पायलट हे भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगत होते आणि भाजपही पायलट यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे भासवत होता. मात्र, आतून संधान बांधले जात होते. या सर्व घडामोडी घडत असताना भाजप नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मात्र, विश्वासात घेतले गेले नव्हते. यामुळे वसुंधरा राजे नाराज  होत्या . त्यांनी मौन धारण केले होते. काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा घेणाऱ्या भाजपला राजे यांनी दुखावणे परवडणारे नव्हते. राजे यांनी तर पक्षाच्या बैठकांवरही उघड बहिष्कार टाकला होता. अखेर वसुंधरा राजे यांच्या नाराजीमुळे राज्यातील भाजप नेत्यांनी पायलट यांचा नाद सोडावा लागला. 

भाजपमध्ये या घडामोडी घडत असताना गेहलोत यांनी मात्र, काँग्रेस आणि सरकारला पाठिंबा देणारे आमदार एकत्र ठेवण्यात यश मिळविले. पायलट यांचे बंड आणि भाजपकडून होत असलेला हल्ला याला गेहलोत एकटेच समर्थपणे तोंड देत होते. गेहलोत यांनी राज्यपाल, पंतप्रधान आणि राष्ट्रपती या सर्वांनाच राज्यातील सत्तासंघर्षात ओढून ते कच्चे खेळाडू नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले होते. अखेर फासे योग्य पडले आणि गेहलोत हे यशस्वी झाले आहे. म्हणजेच पायलट यांचे बंड फसण्यामागे भाजपची खेळी फसली आणि गेहलोतांनी केलेले शर्थीचे प्रयत्न यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल.  

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com