पुन्हा एकदा गेहलोत विरुद्ध पायलट; काँग्रेस आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील धुसफूस पुन्हा नव्याने समोर आली आहे.
rajasthan congress mla hemaram chaudhary resigns from assembly
rajasthan congress mla hemaram chaudhary resigns from assembly

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याविरोधात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील धुसफूस पुन्हा नव्याने समोर आली आहे. पायलट यांचे समर्थक आमदार व ज्येष्ठ काँग्रेस (Congress) नेते हेमाराम चौधरी (Hemaram Chaudahary) यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला असून, पक्षातील मतभेद यामुळे चव्हाट्यावर आले आहेत. 

मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. त्यावेळी आमदार चौधरी हे कायम पायलट यांच्यासोबत उभे राहिले होते. आता त्यांनीच आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

पायलट यांनी माघार घेताना पक्षाकडे काही मागण्या केल्या होत्या. यातील पहिली मागणी होती, पुढील 2023 च्या विधानसभा निवडणुकीआधी पक्षाने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. दुसरी मागणी होती की, त्यांच्या समर्थक आमदारांना चांगली खाती देणे आणि तिसरी मागणी होती की काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांना हटविणे. 

यातील पहिली मागणी मागील वर्षीच मान्य करुन पक्षाने पांडे यांना प्रभारी पदावरुन हटवले होते. परंतु, इतर दोन मागण्या अद्याप पक्षाने मान्य केलेल्या नाहीत. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिपदे तसेच, पक्ष संघटनेत पदे देण्यात आलेली नाहीत. याबाबत चौधरी हे वारंवार उघडपणे आवाज उठवत होते. काही आमदारांनी तर विधानसभेतही या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारला लक्ष्य केले होते. 

चौधरी यांचा राजीनामा हा राजस्थानमध्ये नवीन राजकीय नाट्याची नांदी ठरण्याची चर्चा आहे. आपला राजीनामा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी चौधरी यांनी विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्याकडे केली आहे. काँग्रेसचे नेते मात्र, हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com