अखेर ठरलं! 15 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची लॉटरी

राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, १५ नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाणार आहे.
अखेर ठरलं! 15 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची लॉटरी
Congress Sarkaranama

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री गेहलोतांनी सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. आज सायंकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात 15 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाणार असून, त्यातील 4 राज्यमंत्री असतील.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अजय माकन हेसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. गेहलोत यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक काल सायंकाळी बोलावली होती. या बैठकीत सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांनी घेतले आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात सध्या 21 संख्या असून आणखी 9 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. यात पायलट समर्थक ५ आमदारांची वर्णी लागणार आहे.

पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी, विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीणा यांना कॅबिनेट तर ब्रिजेंद्रसिंह ओला आणि मुरारीलाल मीणा यांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे. विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीणा यांना मागील वर्षी पायलट यांच्यासोबत मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता. सिंह यांच्याकडे पर्यटन तर मीणा अन्न पुरवठा खाते होते. हेमाराम चौधरी हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, माजी महसूल मंत्रीही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Congress
दे धक्का! मुख्यमंत्री गेहलोतांनी तडकाफडकी घेतला संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा

याचबरोबर महेंद्रजितसिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, ममता भूपेश, टिकाराम जुलाई, भजन लाल जाटव, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत या नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. झाहिदा खान आणि राजेंद्रसिंह गुडा यांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Congress
'एनआयए'ला धक्का! अँटिलिया प्रकरणातील क्रमांक दोनच्या आरोपीला जामीन

मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in