दातार यांच्या निवडीनंतर राज ठाकरे यांचाही आनंद गगनात मावेना - raj thaceray congretulates shrikant datar for appointment as Harvard Dean | Politics Marathi News - Sarkarnama

दातार यांच्या निवडीनंतर राज ठाकरे यांचाही आनंद गगनात मावेना

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

श्रीकांत दातार ह्यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करून गेला, अशा शब्दांत त्यांच्या कामगिरीचे राज यांनी कौतुक केले. 

पुणे : हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी श्रीकांत दातार यांची निवड झाल्यानंतर मराठी माणसाचा ऊर भरून आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत मराठी माणसाने येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी माणसाची सत्ता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दातार यांच्याविषयी राज यांनी व्यक्त केलेल्य भावना जशाच्या तशा:

जगातील 'हार्वर्ड बिझनेस स्कुल'च्या डीन पदी श्री. श्रीकांत दातार ह्या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था  जगातील पहिल्या ५ नामांकित संस्थांपैकी आहे. आज असंख्य मराठी तरुण-तरुणी जेंव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस ह्या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख एक मराठी माणूस असणं ह्यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार. 

श्रीकांत दातार ह्यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करून गेला. चार्टर्ड अकाउंटंट- आयआयएममधून व्यवस्थापनाचं शिक्षण- स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी-कार्नेजी मेलन येथे अध्यापन-पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेस स्कुलचे डीन. ह्या हार्वर्ड बिझनेस स्कुल मधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज, आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (जे सध्या महाराष्ट्राचं राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत) ह्यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा.

जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे, आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रिम बुद्दीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्स मध्ये काम करत आहेत, अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्री. श्रीकांत दातार ह्यांचं मनापासून अभिनंदन. मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो ही इच्छा.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख