शिवकुमार अन् सिद्धरामय्या यांच्या वादात राहुल गांधींची मध्यस्थी पण...

कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यात वाद सुरू आहे. यात राहुल गांधींनी मध्यस्थी केली आहे.
शिवकुमार अन् सिद्धरामय्या यांच्या वादात राहुल गांधींची मध्यस्थी पण...
rahul gandhi solve d k shivakumar and siddharamiah power tussle

बंगळूर :  कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनाही थेट राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भेटीला दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद वरकरणी मिटला असला तरी ही तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

भाजपमध्ये मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरू असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही याची सुरवात झाली आहे. राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित झाला आहे. यावरून कॉंग्रेस आमदारांमध्ये वाद सुरू झाला असून, दोन गट पडले आहेत. 

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील वादाची पक्षाच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. या दोघांनाही दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. दोघांशी राहुल गांधींनी चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. याचबरोबर दोन्ही नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याची तंबीही देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचे सध्या तरी दिसत आहे. परंतु, हा केवळ तात्पुरत्या स्वरुपाचा तोडगा आहे, असे मत काँग्रेस नेत व्यक्त करीत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी आदेश दिल्याने हे दोन्ही गट उघडपणे बोलणार नाहीत. मात्र, आतून त्यांच्या कुरघोड्या सुरू राहतील. पुढील विधानसभा निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसला आहे. यामुळे सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. सिद्धरामय्या यांच्यासाठी ही मुख्यमंत्री बनण्याची शेवटची तर शिवकुमार यांच्यासाठी सर्वांत चांगली संधी ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करीत राहणार आहेत. यामुळे राहुल गांधींच्या मध्यस्थीने वरवर शांतता वाटत असली तर आतमध्ये धुसफूस सुरूच आहे. 

कर्नाटकात दोन वर्षांनी म्हणजेच 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दीडशेहून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. निवडणूक निकालानंतर आमदारच मुख्यमंत्र्यांची निवड करतील, असे पक्षाचे म्हणणे आहे. याचबरोबर राज्यात पक्षात संघटनात्मक बदल पुढील काही आठवड्यांत होणार आहेत, अशी  माहिती सूत्रांनी दिली.  

सिध्दरामय्या  आणि शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अस्वस्थ झाले होते. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सुरजेवाला यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पक्षाचे आमदार आणि नेत्यांना ताकीद दिली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in