संसद अधिवेशनाआधीच सरकार अन् विरोधकांच्यात जुंपली - question hour cancelled after discussion with all parties says central government | Politics Marathi News - Sarkarnama

संसद अधिवेशनाआधीच सरकार अन् विरोधकांच्यात जुंपली

मंगेश वैशंपायन
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तराच्या तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन अधिवेशनाआधीच केंद्र सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. 

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. सर्वांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. सरकारने याबाबत प्रश्न उपस्थित करणारे तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन आणि काँग्रेसचे नेते शशि थरूर यांना प्रत्युत्तर दिले आहे. या मुद्द्यावरुन अधिवेशनाआधीच सरकार आणि विरोधकांच्यात जुंपली आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजात काही बदल करण्यात आले आहेत. यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे संसदेच्या प्रशासकीय यंत्रणेने सांगितले आहे. हे अधिवेशन 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात उपस्थित राहण्यापूर्वी खासदारांची कोरोना चाचणी होणार आहे. खासदारांना सभागृहात मास्क लावून बसणे अनिवार्य आहे. तसेच, भाषण करताना मास्क लावणेही गरजेचे आहे. 

याविषयी बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, या अधिवेशनात राज्यसभा खासदारांची बसण्याची व्यवस्था दोन्ही सभागृहांमध्ये करण्यात येत आहे, त्यामुळे प्रश्नोत्तरांच्या तासासाठी विशिष्ट रचना आवश्यक असते त्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाले असते. डेरेक ओब्रायन वगळता याबाबत कोणाला काही अडचण दिसत नाही. प्रश्नोत्तर तास स्थगित करण्यास अन्य पक्षांच्या नेत्यांनी सहमती दिली होती.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा तसेच तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रश्नोत्तर तास रद्द करण्यास सहमती दर्शविली होती. सरकारने प्रश्नोत्तर तास रद्द करणे आणि शून्य प्रहर याचा कालावधी अर्ध्यावर आणून तो फक्त अर्धा तास ठेवणे याबाबत सर्व पक्षांशी चर्चा केली होती, असे जोशी यांनी स्पष्ट केले. 

कोरोना महामारीच्या विशिष्ट परिस्थितीत हे अधिवेशन घेण्यात येत आहे. प्रश्नोत्तर तास घेतला असता तर अधिकाऱ्यांना सभागृहात बसवावे लागले असते. पुन्हा सॅनीटायजेशन करण्यापासून करण्यापासून अनेक समस्या उद्भवल्या असत्या, असे त्यांनी नमूद केले. 

या प्रकरणी शशि थरूर यांनी टि्वट करून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटले होते की, सरकारला प्रश्न विचारणे आता दुर्मिळ झाले आहे. हे सरकार संसदेला फक्त सूचना देत आहे. आपल्या बहुमताचा व सत्तेचा वापर एका रबरी शिक्क्याप्रमाणे करीत आहेत. आपल्या मनाप्रमाणे हे सरकार संसदेत अनेक विषयाना मंजूरी घेत आहेत. या सरकारला आता दूर केले पाहिजे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख