पंजाबमधील तिढा सुटला...कॅप्टन चॉपरने थेट सोनिया गांधींच्या दरबारी हजर - punjab cm amarinder singh meets congress president sonia gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

पंजाबमधील तिढा सुटला...कॅप्टन चॉपरने थेट सोनिया गांधींच्या दरबारी हजर

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्षात आता हाय कमांडने लक्ष घातले आहे. यामुळे या वादावर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षात आता हाय कमांडने लक्ष घातले आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातील वादावर तोडगा निघाल्याचे समजते. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आज चॉपरने दिल्लीत दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. सिद्धू यांना राज्यात मोठे पद दिले जाईल, अशी शक्यता आहे. पक्षांतर्गत वादाचा फटका आगामी निवडणुकांत बसू नये म्हणून आता पक्ष नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राहुल गांधी आणि सिद्धू यांची 30 जूनला भेट झाली होती. प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींची मनधरणी केल्यानंतर ते सिद्धू यांना भेटण्यास तयार झाले होते. ही भेट सुमारे 45 मिनिटे चालली होती. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. अनेक दिवसांपासून सिद्धू हे पक्षनेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. याचवेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही पक्ष नेतृत्वाने भेट दिलेली नव्हती. 

हेही वाचा : जो हुआ सो हुआ...नितीशकुमार म्हणाले, आदरणीय मोदी देतील कबूल! 

अमरिंदरसिंग यांना भेट नाकारणाऱ्या नेतृत्वाने सिद्धू यांना भेट दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. सिद्धू यांचे पारडे आता जड झाल्याचे बोलले जात होते. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर आता अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात आहे. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख