कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणतात, खासदारांचा माझ्यावर भरवसा नाय का..?

राजस्थानमधील काँग्रेसचे बंड शमत असतानाच पंजाबमध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी पक्षाचे दोन खासदार आहेत.
punjab chief minister amarinder singh slams mp pratap singh bajwa
punjab chief minister amarinder singh slams mp pratap singh bajwa

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमत असताना आता पंजाब काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत असून, स्वत:च्याच सरकारविरोधात पक्षाच्या दोन खासदारांनी भूमिका घेतली होती. यातील एक खासदार प्रतापसिंग बाजवा यांनी आता थेट मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावरच खळबळजनक आरोप केले आहेत. यावर अमरिंदरसिंग यांनीही उत्तर दिले आहे. 

पंजाब काँग्रेसमधील वादाच्या केंद्रस्थानी राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा आणि शमशेरसिंग डुल्लो हे आहेत. पंजाबमध्ये विषारी दारूकांड झाले होते. या दारूकांडात तब्बल शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) करावी, अशी मागणी राज्यपाल व्ही.पी. सिंह बडनोर यांच्याकडे या दोघांनी केली होती. 

खासदार बाजवा यांची सुरक्षा राज्य सरकारने काढून टाकली आहे. यावर त्यांनी पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी पत्र लिहिले होते. माझ्या जिवाला काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाबचे पोलीस महासंचालक जबाबदार असतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

माझी सुरक्षा अचानक काढून टाकण्यात आली. पंजाब पोलिसांनी असे करण्यामागील कोणतेही कारण मला दिलेले नाही. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार काल रात्री माझी सुरक्षा काढण्यात आली आहे. माझी सुरक्षा राजकीय कारणातून काढून घेण्यात आली आहे, असे बाजवा यांनी म्हटले आहे. 

यावर मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रताप बाजवा यांचा माझ्यावर आणि सरकारवर भरवसा नव्हता तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जायले हवे होते. त्यांच्या तक्रारी त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर मांडायला हव्या होत्या. पक्ष नेतृत्वावरही त्यांच्या विश्वास नाही का? सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेले प्रताप बाजवा हे राज्यातील एकमेव व्यक्ती नाहीत. कोरोनाच्या ड्युटीमुळे पोलीस कर्मचारी इतरत्र वळविण्यात आले आहेत. 

बाजवा यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड सुरक्षा दिली आहे. या अंतर्गत त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षेसाठी 25 जणांचे पथक मिळाले आहे. त्यानंतर त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, असे अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले. 

पंजाबध्ये आता राजस्थानची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे. पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. आता पायलट यांचे बंड अखेर शमले असले तरी पंजाबमध्ये नवे बंड पक्षाची डोकेदुखी वाढवत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com