अखेर प्रतीक्षा संपली...चार दशकानंतर मिळाली महिला मंत्री - puducherry gets first woman minister as chandira priyanga | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अखेर प्रतीक्षा संपली...चार दशकानंतर मिळाली महिला मंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीने सत्ता मिळवली असून, चार दशकानंतर महिला मंत्री मिळाली आहे. 

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) एनआर काँग्रेस (NR Congress) आणि भाजप (BJP) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच झाला. मुख्यमंत्री एन.रंगास्वामी यांच्या एनआर काँग्रेसला तीन तर भाजपला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. यात चंदिरा प्रियंगा (Chadira Priyanga) यांचा समावेश असून, त्या मागील 41 वर्षांतील पुदुच्चेरीतील पहिल्या मंत्री ठरल्या आहेत. 

चंदिरा प्रियंगा एनआर काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आल्या आहेत. याआधी  काँग्रेस नेत्या रेणुका अप्पादुराई यांना पुदुच्चेरीतील शेवटच्या मंत्री होती. द्रमुक आघाडीच्या सरकारमध्ये 1980 ते 83 या कालावधीत त्यांच्याकडे शिक्षण विभागाचा कार्यभार होता. चार दशकानंतर पुदुच्चेरीत चंदिरा यांच्या रुपाने महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंत्रिपदाची  शपथ घेतल्यानंतर सत्कार स्वीकारत असतानाच चंदिरा यांनी कोणतेही खाते मिळाले तरी काम चांगलेच करणार, असा निर्धार व्यक्त केला. 

चंदिरा यांचे शालेय शिक्षण कराईकल येथे झाले तर अण्णामलाई युनिव्हर्सिटीतून त्यांनी बीबीए पदवी मिळवली. त्यांचे पिता चंदिराकसू हे माजी मंत्री आहेत. चंदिरा यांनी लघुपटातही काम केले आहेय त्यांनी झाशी या लघुपटात शाळेच्या मुख्याध्यापिकेची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले होते. 

हेही वाचा : सहा जणांच्या मंत्रिमंडळात भाजपचे दोन मंत्री पण त्यांचाही खातेवाटपाचा तिढा 

चंदिरा या महिलांचे हक्कांसाठी लढणाऱ्या आहेत. त्यांच्या रुपाने चार दशकानंतर मंत्रिमंडळात एका महिलेला स्थान मिळाले आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि त्यांची छळवणूक या विरोधात मंत्री म्हणून माझा आवाज आणखी भक्कम होईल. मुख्यमंत्र्यांनी मला  महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या माध्यमातून मी महिलांना सक्षम करण्याचे काम करेन. 

एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीला एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर 7 मे रोजी रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता होती. अखेर एनआर काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 मंत्रिपदे मिळाली आहेत. एनआर काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायण, सी.देजाकुमार आणि चंदिरा प्रियांगा यांचा मंत्र्यांमध्ये समावेश आहे. भाजपचे नमशिवायम आणि साई जे सर्वानन यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचा शपथविधी राजभवनात झाला. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळात एकूण सहा मंत्री असून, यात एनआर काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन मंत्री आहेत.     

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख